करोनाचा प्रभाव; टार्गेटच्या निम्मेही उद्दिष्ट गाठणे कठीण
पुणे – करोनाचा प्रभाव बांधकाम विभागाच्या उत्पन्नावर झाला असून साहजिकच यावर्षी ठरवलेल्या उद्दिष्टातील निम्मेही गाठणे अवघड झाले आहे.
करोनाचा परिणाम सर्वच अर्थव्यवस्थेवर झाला असून त्याला बांधकाम विभाग अपवाद नाही. मिळकतकर विभागानंतर सर्वाधिक महसुली उत्पन्न देणारा विभाग म्हणून बांधकाम विभागाकडे पाहिले जाते. हजार, दीड हजार कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवून देणाऱ्या या विभागाचे यंदाच्या आर्थिक वर्षातील म्हणजे एप्रिल 2020 पासून प्रिमियम, बांधकाम आराखड्याला मुदतवाढ आणि अन्य परवानगींमधून बांधकाम विभागाच्या तिजोरीत जेमतेम 75 कोटीच रुपये जमा झाले आहेत.
नोटाबंदीनंतर बांधकाम क्षेत्रातच काहीशी मंदीची लाट होती; परंतु करोनाने आता या क्षेत्राला पुरते ढवळून काढले आहे. प्रकल्प नाहीत, त्यासाठी कामगार नाहीत, दळणवळणावर निर्बंध, कामगार असतील तर त्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजना या सगळ्या गोष्टी पाहता अनेक ठिकाणी बांधकाम बंदच ठेवण्यात आले आहेत. सुमारे अडीचशेच्या आसपास प्रकरणांच्या मंजुरीमधून 75 कोटी रुपये महसूल मिळू शकला आहे. मागील वर्षी या कालावधीत सुमारे 400 कोटी रुपये जमा झाले होते. मागील वर्षी 800 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते त्याच्या जवळपास म्हणजे 750 कोटी रुपयांपर्यंत या विभागाने मजल मारली होती.
पाच ते सहा महिन्यात 100 कोटी रुपयेही जमा झालेले नाहीत. आणखी सहा ते सात महिने हातात आहेत. परंतु, दुप्पट तिप्पट उद्दिष्ट जरी डोळ्यापुढे ठेवले तरी या वर्षात सुमारे 300 ते 350 कोटी रुपये जमा होऊ शकतात, असे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. तरीही यंदाचे दिलेले 700 कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.