शेवगावमध्ये मतदानासाठी महसूल, पोलीस प्रशासन सज्ज  

शेवगाव – शेवगाव- पाथर्डी 222 विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि.21) होणाऱ्या मतदानासाठी महसूल व पोलिस प्रशासन सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकाण यांनी दिली.

या विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 361 मतदान केंद्र स्थापित करण्यात आले असून यात 1 लाख 78 हजार 429 पुरूष, 1 लाख 62 हजार 425 स्रिया तर तृतीयपंथी 6 असे 3 लाख 40 हजार 860 मतदार आहेत. त्यात शेवगाव तालुक्‍यात 1 लाख 89 हजार 341 मतदार तर पाथर्डी तालुक्‍यातील 1 लाख 51 हजार 519 मतदारांचा समावेश आहे. 361 मतदार केंद्रावर प्रत्येकी मतदान केंद्राध्यक्ष (1), मतदान अधिकारी (3), शिपाई (1) व पोलिस कर्मचारी (1) या प्रकारे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राखीव टीमची व्यवस्था केलेली आहे. एकूण 1 हजार 990 मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मतदान प्रक्रियेत एकूण 9 उमेदवार व एक नोटा असे एकूण 10 उमेदवारांची संख्या राहणार आहे. मतदानासाठी एक बॅलट युनिट व एक कंट्रोल युनिट असणार आहे. मतदान प्रक्रिया सुरू होण्याअगोदर प्रत्येक मतदान केंद्रावर उमेदवार प्रतिनिधींच्या समक्ष अभिरूप मतदान (मॉकपोल) घेण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विनोद भामरे व नामदेव पाटील यांनी दिली.

निवडणूक कार्यालयाच्या आवारात उभारलेल्या शामिन्यामध्ये मतदान यंत्रे व साहित्यांचे पॅकिंग वाटप करण्यासाठी 1 ते 18 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर 20 केंद्राचे साहित्य वितरीत करण्याचे नियोजन केले आहे. तसेच निवडणूक कामी नियुक्‍त केलेल्या कर्मचाऱ्यांना संबंधित मतदान केंद्रावर पोहच करण्यासाठी विविध पथके, दिव्यांग, राखीवसाठी 41 बस, 10 मिनीबस, 103 जीप व 3 ट्रक अशा 167 वाहनांची सोय केलेली आहे.

निवडणूक कार्यालयात वैद्यकिय अधिकाऱ्यांचे पथकाला पाचारण करण्यात आले असून प्रत्येक मतदान केंद्रावर आशा स्वयंसेविकांमार्फत प्रथमोपचार साहित्य उपलब्ध करण्यात येणार आहे.मतदारसंघात एक पोलिस उपअधिक्षक, दोन पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक व चारशे पोलिस कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. संवेदनशील मतदान केंद्रावर शांतता राहण्यासाठी एक पॅरा मिलिटरी फोर्सची तुकडी दाखल झाली आहे. मतदारसंघात सोमवारी (दि.21) मतदानाच्या दिवशी शेवगाव तालुक्‍यातील मुंगी, शहरटाकळी तर पाथर्डी तालुक्‍यातील कासारपिंपळगाव व येळी येथील आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.