कराड (प्रतिनिधी) – येथील प्रीतिसंगम व कृष्णा नदीपात्रातून ट्रक्टर, डंपर तसेच दुचाकीवरून वाळूची चोरटी वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी झाल्यानंतर महसूल प्रशासनाने तातडीने याची दखल घेतली. कराड शहरातून नदीपात्राकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर जेसीपीच्या सहाय्याने चर मारण्यात आली आहे.
कराड तालुक्यात वाळू चोरीच्या सुळसुळात सुरूच आहे. या बेकायदेशीर वाळू उत्खननाला रोखण्यात येथील महसूल प्रशासनाला सपशेल अपयशी ठरले आहे. त्यात विशेषकरून कराड शहरातून प्रीतिसंगमाकडे तसेच नदीपात्राकडे जाणारे अनेक मार्गावरून चोरट्या वाळूची वाहतूक सुरू आहे. त्यासाठी नेहमीच्या वर्दळीचे मार्ग वगळता अन्य मार्गे वाळू चोर अवलंबत असल्याचे वारंवार समोर आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून वैकुंठभूमी लगतहून नदीपात्रात तसेच कमळेश्वर मंदिरालगतचा मार्ग चोरट्या वाळू वाहतुकीसाठी वापरला जात आहे. याशिवाय प्रीतिसंगम ते वाकाण परिसरातून नदीपात्राकडे जाणाऱ्या अनेक मार्गावरून सातत्याने वाळूची वाहतूक सुरू आहे. मध्य रात्रीच्यावेळी जेसीबीच्या सहाय्याने ट्रक्टर तसेच डंपरचा वापर करून वाळू चोरी होत होती. दुचाकी तसेच गाढवांचाही वापर वाळू वाहतुकीला केला असल्याचे समोर आले आहे.
याबाबतच्या तक्रारी वाढू लागल्याने महसूल प्रशासनाने जेसीबीच्या सहाय्याने नदीपात्राकडे येणाऱ्या सर्व मार्गावर जेसीपीच्या सहाय्याने महाकाय चर मारली असून चोरी रोखण्याचा प्रयत्न महसूल विभागाने केला आहे.
खांद्यावरून वाळूची वाहतूक
कराड प्रीतिसंगमावरून वाळू चोरण्यासाठी चोरट्यांनी विविध कुल्प्त्या शोधून काढल्या आहेत. वाळू चोरी रोखण्यासाठी नदीपात्रात चर मारली आहे. असे असतानाही काही चोरटे वाळू पोत्यात भरून खांद्यावरून पायी वाहतूक करत असून एक विशिष्ठ ठिकाणी साठाकरून त्याची विक्री केली जात आहे. त्यांच्या कारवाई होणार का? अशी चर्चा आहे.