वेण्णालेकमधील बोट क्‍लबला महसूल विभागाचा ब्रेक

पालिकेकडून रखडले परवान्यांचे नूतनीकरण
दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे 

महाबळेश्‍वर – वेण्णालेक बोट क्‍लबच्या परवान्याच्या नूतनीकरणासाठी महसूल विभागाने यापूर्वी कोणीच मागितली नाही अशा कागदपत्रांची मागणी करून पालिकेची कोंडी केली आहे. या कागदपत्रांवरून महसूल विभागाला जाब विचारण्याची आवश्‍यकता असताना सत्ताधारी गट मात्र वेगळ्याच कारणाने चिंतीत असल्याने महसूल विभागाच्या विरोधात ब्र शब्द काढण्यास तयार नाही. त्यामुळे “धरलं तर चावतयं, सोडलं तर पळतंय’ अशी सत्ताधारी गटाची अवस्था झाली आहे. बोटक्‍लब बंद असल्याने पालिकेला मात्र रोज साधारण दीड ते दोन लाख रुपयांचे नुकसान होत आहे.

महाबळेश्‍वर हे राज्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे, येथे दरवर्षी पंधरा ते आठरा लाख पर्यटक सहलीसाठी येतात, शहरापासून दोन किमी अंतराव असलेले वेण्णालेक हे येथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे, कारण या ठिकाणी पालिकेच्यावतीने नौकाविहाराची सोय करण्यात आली आहे, तसेच पालिकेने तत्कालिन जिल्हाधिकारी यांच्या खास परवानगीने येथे बोटक्‍लब सुरू केला आहे. तेव्हापासून दरवर्षी बोटक्‍लब परवान्याचे नूतनीकरण करण्यात येते.

नूतनीकरण असल्याने महसूल विभागाच्यावतीने कागदपत्रांची पडताळणी सोप्या पध्दतीने केली जाते, याबाबत पालिकेला कधीच अडचण भासली नाही. विशेष म्हणजे परवान्याच्या नूतनीकरणासाठी पालिकेचे मुख्याधिकारी अथवा नगराध्यक्षा वेळीच पाठपुरावा करून मुदत संपण्यापुर्वीच परवान्याचे नुतनीकरण करून घेत असत. सध्या पालिकेत सत्तेवर असलेले भाजपाचे लोकप्रतिनिधी आणि पालिकेचे मुख्याधिकारी यांना मात्र बोटक्‍लब परवान्याचे नूतनीकरण करण्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. महसूल विभागाचे अधिकारी यांनीदेखील बोटक्‍लबला परवाना आहे का नाही? हे पाहण्याची कधी तसदी घेली नाही.

12 जून रोजी येथे अपघात घडला आणि यामध्ये एका युवकाला आपल्या प्राणास मुकावे लागले आणि सर्व यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यानंतर पालिकेच्या मुख्याधिकारी यांनी धावपळ करून त्याच दिवशी म्हणजे 12 जून रोजी बोटक्‍लब नुतनीकरणासाठी तहसिलदार यांच्याकडे अर्ज सादर केला. दरम्यान बोटक्‍लबला परवाना नसल्याने हा बोटक्‍लब बंद करण्याची तोंडी सूचना पोलीस विभागाने केल्याने हा बोटक्‍लब ऐन हंगामात बंद पडला आहे. महसूल विभागाने मागणी केलेली सर्व कागदपत्रे जमा करण्यासाठी पालिकेला धावपळ करावी लागणार आहे. प्रमाणपत्रांसाठी टेबलावर प्रकरण सादर करून चालणार नाही तर टेबला खालूनही प्रयत्न करावे लागणार आहे त्यामुळे हा बोटक्‍लब कधी चालू होईल हे सांगणे कठीण होऊन बसले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)