Shirur News | महसूल प्रशासनाने केली चौदा मजुरांची गुलामगिरीतून सुटका..

प्रभात वृत्तसेवा
शिरूर – तालुक्यातील आलेगाव पागा येथील एका गुऱ्हाळात बेकायदेशीररीत्या बंदिस्त ठेवण्यात आलेल्या चौदा मजुरांची अखेर सुटका करण्यात महसूल व पोलिस प्रशासनाला यश आले आहे.दोन वर्षांहून अधिक काळ अत्यंत हालापेष्टांमध्ये जगणाऱ्या या मजुरांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी लेबर लाइन सामाजिक संस्थेचे प्रयत्न निर्णायक ठरले.
ज्ञानेश्वर चव्हाण (रा. संभाजीनगर) यांनी लेबर लाईन पोर्टलवर दाखल केलेल्या तक्रारीत सांगितले की, आलेगाव पागा येथील एका शेतगुऱ्हाळात त्यांच्यासह अन्य १३ मजूरांना जबरदस्तीने मजुरीसाठी अडकवून ठेवण्यात आले असून, त्यांना मानसिक, आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. ही तक्रार गांभीर्याने घेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार उपविभागीय अधिकारी पूनम अहिरे, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के, नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी, कामगार निरीक्षक संपत गुंजाळ आणि लेबर लाईन संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी जाऊन सर्व मजुरांची सुटका केली.
सुटकेनंतर या सर्व कामगारांना शिरूर तहसील कार्यालयात आणून अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आले. त्यांना तातडीने भोजनाची व्यवस्था करून त्यांच्या मूळ गावी पाठविण्याची सोय केली. या वेळी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार, लेबर लाईनचे शुभम गुरव, पराग कांबळे आणि अर्चना यादव हे उपस्थित होते. तक्रारदार चव्हाण यांच्या तक्रारीनुसार संबंधित शेतमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.





