भावाच्या खूनाचा बदला; सराईत गुन्हेगाराची रामटेकडीत दहशत

हत्यारे घेऊन चार घरांमध्ये केली तोडफोड : वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे: सराईत गुन्हेगाराने साथीदारांच्या मदतीने वस्तीतील चार ते पाच घरांमध्ये घुसून हत्यारांनी घरातील साहित्यांची तोडफोड केली. यानंतर वस्तीतील कुटूंबांना शिवीगाळ करत धमकी दिली . ही घटना हडपसर रामटेकडी येथे विश्‍वरत्न मित्र मंडळा समोर घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी सराईत गुन्हेगार लकिसिंग गब्बरसिंग टाक, तौफिक शेख व दोन अल्पवयीन मुलांवर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी राजू थोरात (44, रा.रामटेकडी, हडपसर) हे घरात असताना आरोपी लकिसिंग साथीदारांसह त्यांच्या घरात घुसला. त्यांना ” तुम्हारा लडका किधर है, उसे जिंदा नही छोडूंगा मेरे भाईके मर्डरमे उसका भी हात है’ असे म्हणत लोखंडी कोयत्याने राजू यांच्यावर वार केला. मात्र त्यांनी तो चुकवल्याने कोयत्याचा वार फ्रिजवर लागला. तर तैफिकने लोखंडी रॉडने घरातील टीव्ही, पाण्याचा माठ, कपाटाची काच फोडली. यानंतर त्यांच्या घराशेजारी रहाणाऱ्या चार महिलांच्या घरात आरोपी घुसले. त्यांनाही “तुम्हारे बेटे किधर हे, उन सबने मिलकर मेरे भाई को मारा है’ असे म्हणत त्यांना शिवीगाळ करत दहशत माजवून घरातील वस्तुंचे नुकसान केले आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक भोलेनाथ अहिवळे करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार आरोपी लकिसिंग याच्या सख्ख्या भावाचा एक वर्षापूर्वी खून झाला होता. या खूनातील आरोपींनी येथील मुलांनी मदत केली असल्याचा त्याचा संशय होता. याच रागातून त्याने सोमवारी सायंकाळी साथीदारांसह वस्तीत येऊन तोडफोड करत दहशत माजवली. गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार असून पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.