पिंपरी – कोविड-19 ची सौम्य अथवा कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांना दाखल करुन घेत, त्यांच्याकडून उपचारापोटी अव्वाच्या सव्वा बिले उकाळणाऱ्या शहरातील रुग्णालयांनी बिल देयकांची फेरगणना करुन, केवळ आवश्यक बाबींचे बिल देयक आकारावे. तसेच यामध्ये आकारलेली अतिरिक्त बिलाची रक्कम रुग्णांना परत करण्याची नोटीस चौकशी समितीने रुग्णालयांना बजावली आहे.
याशिवाय नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांनी एका आठवड्यात खुलासा करण्यास सांगितले आहे. आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त एन. अशोक बाबू यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने या नोटीस बजावल्या आहेत.
केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार, कोविड-19 ची सौम्य अथवा कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णांना उपचाराकरिता दाखल न करुन घेण्याचे निर्देश आहेत. मात्र, काही रुग्णालयांनी अशा रुग्णांना दाखल करु घेत, उपचारदेखील केले. मात्र, दाखल रुग्णांची संख्या आणि वापर केलेल्या पीपीई किटची संख्या यांचा ताळमेळ घेऊन, त्याप्रमाणे पीपीई किटचे दर आकारणी करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
निर्देश निकष व नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीसमध्ये गंभीर लक्षणे असलेल्या कोविड-19 बाधित रुग्णांकडून डिपॉझिट घेऊ नये, असेही सांगितले आहे.