सभापती आव्हाडांची पाच दिवसातच घरवापसी

जामखेड: पाच दिवसांपूर्वीच भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले जामखेड पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांनी पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जत तालुक्यातील शेगूडवाडी येथे पुन्हा भाजपात प्रवेश केला. दरम्यान पालकमंत्री राम शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का दिला असल्याचं बोललं जातंय.

सोमवार दि. २३ रोजी कर्जत येथे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या निर्धार मेळाव्यात जामखेड पंचायत समितीचे विद्यमान सभापती सुभाष आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यावेळी सभापती सुभाष आव्हाड यांनी भाजपमध्ये घुसमट होत असल्याचा आरोप केला होता.

त्यानंतर चार दिवसानंतर सुभाष आव्हाड यांनी कर्जत तालुक्यातील शेगूडवाडी येथील कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, कर्जत नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, जामखेड भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र सुरवसे, जिल्हा सरचिटणीस मनोज कुलकर्णी, कर्जत भाजपा तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, जामखेडचे नगराध्यक्ष निखिल घायतडक, माजी सभापती भगवान मुरूमकर, सरपंच प्रशांंत शिंदे. ज्योती क्रांती संस्थेचे अध्यक्ष आजीनाथ हजारे, पणन संचालक डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष अजय काशीद यांच्या उपस्थितीत प्रवेश केला यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.