जम्मू काश्‍मीरमधील परप्रांतियांचा परतीचा प्रवास सुरू; बस, रेल्वे स्थानकांवर लांबच लांब रांगा

जम्मू – जम्मू काश्‍मीरमध्ये परप्रांतीय कामगारांना दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जाऊ लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर तेथील परप्रांतीय कामगारांनी आता आपल्या मुलाबाळांसह परतीचा प्रवास सुरू केला आहे. 

रेल्वे स्थानक आणि बस स्थानकांवर या परप्रांतीय कामगारांनी गर्दी करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे जम्मू आणि उधमपूर येथील रेलवे आणि बस स्थानकांवरील सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. आपापल्या घरी परत जाण्यासाठी निघालेल्या या परप्रांतीयांची संख्या खूप जास्त आहे. त्यामुळे वाहतुक व्यवस्थेवर ताण येऊ लागला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जम्मू येथील बस स्थानकाबाहेर या परप्रांतियांच्या कुटुंबीयांनी ठाण मांडले आहे. पाणी आणि निवाऱ्याच्या मूलभूत सोयींव्यतिरिक्त हे परप्रांतीय आपल्या मुलाबाळांसह तिकीट मिळेपर्यंत बस स्थानकाबाहेरील रस्त्यावरच राहिले आहेत. त्यांनी तिकीटांसाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत.

प्राथमिक अंदाजानुसार दरवर्षी 3-4 लाख परप्रांतीय काश्‍मीर खोऱ्यात येत असतात. यामध्ये बहुसंख्य हिंदू असून उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड आणि उत्तराखंडमधून ते येत असतात. गवंडीकाम, सुतारकाम, वेल्डींग आणि शेतीसारखे उद्योग करण्यासाठी हे कामगार दरवर्षी मार्चमध्ये येत असतात. मात्र परप्रांतीयांना लक्ष्य केले जायला लागल्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रविवारी कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी दोन परप्रांतियांची हत्या केली. यामुळे या महिन्यात जम्मू काश्‍मीरमध्ये हत्या झालेल्या परप्रांतीयांची संख्या 11 झाली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.