चिंचवड (वार्ताहर) – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी लॉकडाऊनकाळात हातगाड्या, टपऱ्यावरून व्यवसाय करण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून व्यवसाय करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील घरकुल व इतर भागातील व्यावसायिकांचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हातगाड्या, टपऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्या दंड न आकारता परत कराव्यात असे निवेदन पिंपरी-चिंचवड महानगर हॉकर्स युनियनच्या वतीने महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पथारीधारकांच्या उपजीविकेचे साधन हिरावून घेतल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. हातगाडी, टपऱ्यातून भाजीविक्री, मसाले, अंडीविक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्याच्या टपऱ्या व हातगाड्या जप्त केल्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. युनियनच्या माध्यमातून जप्त केलेल्या वस्तू विना दंड आकारून परत द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
प्रभागानुसार सर्वेक्षण करून हॉकर्स झोन निर्माण करून व्यवसायासाठी अधिकृत बायोमेट्रिक कार्ड गरजूंना त्वरित देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. निवेदनावर युनियनचे क्रांतिकुमार कडूलकर, सचिन देसाई, स्वप्नील जेवळे, सुषमा इंगोले, गणेश दराडे यांची स्वाक्षरी आहे.