1981 मध्ये आलेल्या “प्रेमगीत’ या चित्रपटातून सिनेकारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या अनिता राज या अभिनेत्रीचा जलवा आजही कायम आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर ती गेली तीन दशके प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे.
सध्या ती “मॅराथॉन’ या चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आली आहे. या चित्रपटाचे कथानक अत्यंत प्रेरणादायी आहे. चित्रपटात एका 60 वर्षांच्या गरीब पण सशक्त महिलेची जीवनकथा दाखवण्यात आली आहे. सदर महिला आपल्या पतीच्या उपचारांसाठी साठाव्या वर्षी मॅराथॉनमध्ये भाग घेते आणि जिंकते असे या चित्रपटाचे कथानक आहे.
चित्रपटाविषयी अनिता खूप उत्सुक आहे. या निमित्ताने तिच्याशी बातचीत केली असता अनिता म्हणते की, माझ्या डिक्शनरीमध्ये रिटायरमेंट हा शब्द नाही. मी खूप लकी आहे की माझ्याकडे आजही चांगल्या स्क्रिप्ट येतात. माझ्या कोट्यवधी चाहत्यांनी माझ्यावर केलेल्या प्रेमाचे हे फलित आहे असे मी मानते.