निवृत्त सैनिकाला मारहाण प्रकरण : भाजप खासदार उन्मेष पाटील यांच्या चौकशीचे आदेश

2016 मधील निवृत्त सैनिकाला मारहाण प्रकरण

मुंबई – शिवसैनिकांनी मुंबईतील माजी नौदल अधिकाऱ्याला केलेल्या मारहाणीचा मुद्दा ताजा असतानाच, आता 2016 मध्ये माजी सैनिक सोनू महाजन यांना केलेल्या मारहाणी प्रकरणी भाजपचे खासदार उन्मेष पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

2016 साली मारहाण झालेले माजी सैनिक जळगावातील चाळीसगावातील होते. तत्कालीन भाजप आमदार आणि विद्यमान खासदार उन्मेष पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 2016 मध्ये सोनू महाजन यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यावेळी भाजपचे सरकार असल्याने सोनू महाजन यांची तक्रार पोलिसांनी घेतली नाही, गुन्ह्याची नोंद झाली नाही.

याविरोधात सोनू महाजन हायकोर्टात गेले. हायकोर्टाने सोनू महाजन यांची तक्रार दाखल करुन गुन्ह्याची नोंद करण्याचे निर्देश दिले. यानंतर 2019 मध्ये गुन्हा दाखल झाला. अशाप्रकारची अनेक निवेदने आल्यानंतर मारहाणी प्रकरणी उन्मेष पाटील आणि साथीदारांची चौकशी करण्याचे आदेश जळगावचे पोलीस अधीक्षक आणि सहकाऱ्यांना दिले आहेत, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

देशमुख सर्वात अपयशी गृहमंत्री – भातखळकर
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ट्‌वीटनंतर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. अनिल देशमुख हे आतापर्यंतचे सर्वात अपयशी गृहमंत्री आहेत. राष्ट्रवादीचे एजंट म्हणून काम करणारे गृहमंत्री आहेत. असे म्हणत “ट्‌वीट काय करता? कारवाई करा ना,’ असे आव्हानही भातखळकर यांनी दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.