सेवानिवृत्त न्यायाधीशांमार्फत होणार मुख्य न्यायाधीशांविरोधातील ‘षडयंत्राची’ चौकशी – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये काम करणाऱ्या एका माजी कर्मचारी महिलेने लैंगिक शोषणाचे आरोप लावल्याने देशभरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश असलेल्या रंजन गोगोई यांनी आपल्यावर लावण्यात आलेले आरोप फेटाळताना हे न्यायव्यवस्थेच्या विरोधात काही मोठ्या लोकांचे षडयंत्र असल्याचं म्हंटलं होतं.

दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांवर लावण्यात आलेले लैंगिक शोषणाचे आरोप हे एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा दावा वकील उत्सव सिंह बायन्स यांनी केला होता. त्यांनी याबाबत न्यायालयासमोर एक प्रतिज्ञापत्र देखील सादर केले होते. या कारस्थानाशी संबंधित काही महत्वाचे पुरावे आणि धागेदोरे आपल्याजवळ असल्याचा दावा देखील बायन्स यांनी केल्याने सर्वोच्च न्यायालयामध्ये आज याबाबत सुनावणी घेण्यात आली होती.

ऍडव्होकेट उत्सव सिंह बायन्स यांनी आज सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांवर लावण्यात आलेले लैंगिक शोषणाचे आरोप हे एका मोठ्या कटाचा भाग असल्याचा दावा केला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ऍडव्होकेट उत्सव सिंह बायन्स यांच्या दाव्यावर चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश ए के पटनाईक यांची नेमणूक केली आहे. निवृत्त न्यायाधीश ए के पटनाईक हे ऍडव्होकेट उत्सव सिंह बायन्स यांच्यातर्फे करण्यात आलेल्या दाव्यांवर सुनावणी करणार असले तरी ते सर्वोच्च न्यायालयात त्रि-सदस्यीय समितीपुढे सुरु असलेल्या मुख्य न्यायाधीशांविरोधातील लैंगिक शोषणाच्या आरोपांच्या सुनावणीमध्ये सहभाग घेणार नाहीत.

तत्पूर्वी, ऍडव्होकेट उत्सव सिंह बायन्स यांनी न्यायालयासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये ‘आपल्याला अजय नामक एका व्यक्तीने सर्वोच्च न्यायालयातील माजी महिला कर्मचाऱ्याची बाजू मांडण्यासाठी व सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यन्याधीशांविरोधात पत्रकार परिषद घेण्यासाठी १.५ कोटी देण्याची तयारी दर्शवली होती.’ असं म्हंटलं होतं.

याबाबत सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने, “जर काही श्रीमंत लोकांना ते पैशाच्या जोरावर न्यायपालिका चालवू शकतील असा भ्रम निर्माण झाला असेल तर त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे.” असे खडे बोल सुनावले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.