जागतिक क्रीडा क्षेत्रात असे अनेक खेळाडू आहेत की, ज्यांना निवृत्ती कधी घ्यायची हेच कळत नाही आणि मग जेव्हा त्यांना डच्चू दिला जातो तेव्हा त्यांना जाग येते.
बोरिस बेकर, जॉन मॅकॅन्रोपासून महान कपिल देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपर्यंत अनेकांना निवृत्ती कधी घ्यायची, याचा अंदाज आला नाही. आज तेच सेरेना विल्यम्स आणि रॉजर फेडरर यांच्याबाबत घडत आहे. कारकीर्द तर कधीच संपली होती, ती त्यांनी लांबवण्याचा केविलवाणा प्रयत्न का सुरू ठेवला आहे, तेच समजेनासे झाले आहे. आता खरेच त्यांना सांगायची वेळ आली आहे की, आता सन्मानाने निवृत्त व्हा.
टेनिसचा खेळ हा फार तर 5 ते 7 वर्षे कारकीर्द असणारा पण काही खेळाडू त्याला अपवाद ठरले, यात शंका नाही. पण आता सेरेना आणि फेडरर 39 वर्षांचे आहेत. आणखी किती काळ खेळता येणार. इतकेच नव्हे तर त्यांना आता क्रीडा क्षेत्रात मिळवण्यासारखे तरी काय बाकी राहिले आहे. सेरेनाने 23 ग्रॅंडस्लॅम विजेतेपदे पटकावली आहेत. हाच मुळात जागतिक विक्रम आहे. मग आता काय हस्तगत करायचे आहे.
फेडररच्या बाबतीत तर असे सांगावेसे वाटते की, आता इतरांना जिंकू दे. भले त्याला गेल्या काही वर्षांपासून नोवाक जोकोवीच व राफेल नदालने सातत्याने पराभूत केले आहे. पण जो फेडरर जागतिक टेनिसने पाहिला त्याची सर जीमी कॉर्नर्स, पॅट कॅश, इव्हान लेंडल, बेकर, मॅकॅन्रो इतकेच काय पीट सॅम्प्रालाही येणार नाही. फेडेक्सने जागतिक टेनिस जवळपास दोन दशके वर्चस्वाने व मक्तेदारीने गाजवले. इतके सातत्य अन्य खेळाडूंकडे फारसे पाहायला मिळाले नाही.
सेरेनाने 23 तर, फेडररने 20 ग्रॅंडस्लॅम क्राउन जिंकली. या व्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय स्तरावर टेनिसच्या ज्या अन्य मानाच्या स्पर्धा होतात त्यातील विजेतेपदांचा तर हिशेबही लावता येणार नाही. फेडररने सलग 310 आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी राहण्याचाही विक्रम साकार केला होता.
आता त्याला वय लवपता येणार नाही. त्याच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रियाही झाली. तरीही त्याने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला. तिसरी फेरी जिंकून उपांत्यपूर्व फेरीही गाठली मात्र, त्याचवेळी त्याच्या दुखापतीने डोके वर काढले व त्याने अखेर स्पर्धेतून माघार घेतली. पण तरीही त्याची कारकीर्द लांबवण्याची इच्छा कमी झालेली दिसत नाही.
त्याला अखेरची विम्बल्डन स्पर्धा खेळायची आहे व सेंटर कोर्टवरच निवृत्ती जाहीर करायची आहे, पण प्रश्न हा आहे की जोकोवीच किंवा नदाल त्याला सेंटर कोर्टवर होणाऱ्या विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात पोहोचू देतील का. वेळ निवृत्तीची आहे कारकीर्द लांबवण्याची नाही, हे आता त्याला कधी लक्षात येणार.
दुसरीकडे सेरानाच्या बाबत बोलायचे तर तिला टेनिसमधील पॉवर हिटरच म्हणावे लागेल. सलग 319 आठवडे जागतिक महिला टेनिसमध्ये अव्वल स्थानी राहिलेल्या सेरेनाने व्यावसायिक टेनिसमध्ये पाऊल ठेवल्यापासून राज्य निर्माण केले, टिकवले व वाढवलेही; पण आता वयाची चाळीशी जवळ येत असतानाही तिला खेळतच राहण्याची ही दुर्बुद्धी कशी सुचत आहे. तिची बहीण व्हिनस विल्यम्सला आपण आता थांबायला हवे ते योग्य वेळी लक्षात आले, ते सेरेनाला का समजत नाही हाच मोठा प्रश्न आहे.
एकेरीची 23 तर दुहेरीची 14 विजेतीपदे पटकावून ख्रिस एव्हर्ट, मार्टिना नवरातीलोव्हा, स्टेफी ग्राफ, मोनिका सेलेस, जेनीफर कॅप्रीयाती अशा दिग्गज खेळाडूंचे राज्य खालसा करत सेरेनाने जागतिक टेनिसवर अधिसत्ता गाजवली. तिने खरेतर पुरूष एकेरीत खेळायला हवे, असे विनोदाने म्हटले जायचे ते तिचा तुफानी वेगवान खेळ पाहून. पण आता त्यात ना वेग राहिला आहे ना ग्लॅमर, मग निवृत्तीचा निर्णय घ्यायला विलंब का.
या दोन्ही महान खेळाडूंना एकच सांगावेसे वाटते की, जोवर प्रतिष्ठा आहे तोपर्यंतच निर्णय घ्यायला हवा. कारकिर्दीच्या शिखरावर असतानाच निवृत्ती घेतली तर त्याचा गौरव होतो. जे विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी करून दाखवले ते इतरांना का जमू नये.
अमित डोंगरे