टायगर अभी जिंदा है म्हणणाऱ्या ज्योतिरादित्य यांच्यावर पलटवार ; दिग्विजय आणि नाथ यांनी उडवली खिल्ली

 

भोपाळ -टायगर अभी जिंदा है, असे म्हणणारे भाजपचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर कॉंग्रेसकडून जोरदार पलटवार करण्यात आला आहे. त्या वक्तव्याची कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असणारे दिग्विजय सिंह आणि कमल नाथ या माजी मुख्यमंत्र्यांनी खिल्ली उडवली आहे.

ज्योतिरादित्य आणि त्यांच्या 22 समर्थक आमदारांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी कॉंग्रेसला मध्यप्रदेशची सत्ता गमवावी लागली. त्यातून भाजपचा सत्तेचा मार्ग सुकर झाला. त्यानंतर गुरूवारी मध्यप्रदेश मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. मंत्रिपदी डझनभर समर्थकांची वर्णी लागल्याने ज्योतिरादित्य यांचा प्रभाव अधोरेखित झाला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ज्योतिरादित्य यांनी कॉंग्रेसला डिवचणारी प्रतिक्रिया दिली. टायगर अभी जिंदा है असे मी दिग्विजय आणि नाथ यांना सांगू इच्छितो, असे ते म्हणाले.

त्यानंतर दिग्विजय आणि नाथ यांनी शुक्रवारी ज्योतिरादित्य यांना प्रत्युत्तर दिले. एका जंगलात एकच वाघ राहतो, असे ट्विट दिग्विजय यांनी केले. वाघाची शिकार करण्यावर काही वर्षांपूर्वी बंदी नव्हती. त्यावेळी ज्योतिरादित्य यांचे वडील दिवंगत माधवराव शिंदे यांच्यासमवेत मी वाघांची शिकार करायचो, याची आठवणही त्यांनी करून दिली. तर, कागदी वाघ जिवंत आहे की सर्कसमधील, असा मिस्कील सवाल करत नाथ यांनी ज्योतिरादित्य यांना शाब्दिक टोमणा मारला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.