पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कर्नाटकच्या धर्तीवर राज्यातील कंत्राटी सफाई कामगारांना कायम करावे, कंत्राटी कामगार पद्धती रद्द करावी आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी पुणे महापालिका भवनाबाहेर शुक्रवारी आंदोलन करण्यात आले.
या मागण्यांबाबत शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी अध्यादेश काढला नाही, तर कामगारांची एकजूट दाखवून देऊ असा इशाराही या वेळी देण्यात आला. या मागणीसह राज्यातील दोन लाखांहून अधिक कंत्राटी सफाई कामगारांचे मोठे आर्थिक, सामाजिक शोषण होत आहे.
त्यांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी, ई.एस.आय. सुविधा दिली जात नाही. वेतन चिठ्ठी, ओळखपत्र, गमबूट, मास्क, हातमोजे तसेच सफाई साहित्यही कंत्राटदार देत नाहीत, असे निवेदन यावेळी महापालिका प्रशासनास देण्यात आले.
पुणे महानगरपालिका कामगार युनियन, महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघ, ऑल इंडिया म्युनिसिपल अँड सॅनिटेशन वर्कर्स फेडरेशन, एक्टू यांच्या विद्यमाने हे आंदोलन करण्यात आले. राज्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रवेशद्वारावरही याच धर्तीवर आंदोलन करण्यात आले. पुण्यात झालेल्या आंदोलनात कामगार सभाही घेण्यात आली.