किरकोळ वाहन विक्रीत 38 टक्‍क्‍यांची घट

नवी दिल्ली –वितरकांनी ग्राहकांना विकलेल्या कारच्या विक्रीमध्ये जून महिन्यात 38 टक्‍क्‍यांची घट झाली. या महिन्यात केवळ 1,26,417 एवढ्या कार विकल्या गेल्या. 

वितरकांच्या संघटनेने यासंदर्भात जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, गेल्या वर्षी जून महिन्यात 2,05,011 कार विकल्या गेल्या होत्या. जून महिन्यात दुचाकी विक्री 40 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 7,90,118 इतकी झाली आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात 13,37,462 इतक्‍या दुचाकी विकल्या गेल्या होत्या. जून महिन्यात सर्वात जास्त परिणाम व्यावसायिक वाहन विक्रीवर झाला आहे.

व्यावसायिक वाहन विक्री 84 टक्‍क्‍यांनी कमी होऊन या महिन्यात केवळ 10,509 एवढी झाली असल्याचे या संघटनेचे अध्यक्ष आशिष हंसराज काळे यांनी सांगितले. ग्रामीण भागात पाऊस चांगला पडल्यामुळे मागणी वाढली आहे. त्याचबरोबर ट्रॅक्‍टरच्या विक्रीवर परिणाम झालेला नाही. त्यामुळे ही आकडेवारी थोडीशी चांगली आहे.

अन्यथा वाहन विक्री मोठ्या प्रमाणात कमी झाली असती. केंद्र सरकारने नवीन वाहन खरेदी वाढण्यासाठी धोरण जाहीर करण्याची गरज आहे. जुनी वाहने मोडीत काढण्याचे धोरण लवकरात लवकर जाहीर करण्याची गरज आहे. अन्यथा लहान उद्योगांसमोरील अडचणी वाढत जातील, असे काळे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.