उत्सवातही विक्री होणार नाही

विक्री 25 टक्‍क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता

नवी दिल्ली – भारतात दसरा आणि दिवाळी या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी होते. मात्र, यावर्षी ही खरेदी किमान 25 टक्‍क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता असल्याचे बहुतांश रिटेलर्स वाटते.  यासंदर्भात नकारात्कम निष्कर्ष असलेले बरेच पाहणी अहवाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे काही रिटेलर्सनी दिलेल्या मालाची ऑर्डर रद्द करण्याचा विचार चालू केला आहे.

उत्सवाच्या काळात बाजारपेठेची परिस्थिती काय असेल यासंदर्भात ब्ल्यू पाय या कंपनीने राष्ट्रीय पातळीवर सर्वेक्षण केले आहे. 69 टक्‍के रिटेलर्सनी सांगितले की, आम्ही खरेदी केलेला माल विकला जाईल की नाही, याबाबत आम्हाला शंका आहे. जर तसे झाले तर इन्व्हेंटरीचे काय करायचे, त्याचबरोबर कर्मचाऱ्याचे पगार कसे करायचे याबद्दल आम्हाला चिंता आहे.

रिटेलर्सनी जाहिरातीवरील खर्च कमी केला आहे. त्याऐवजी आहे ते ग्राहक टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रिटेलर्सच्या वार्षिक वेळापत्रकामध्ये उत्सवाच्या काळाला मोठे महत्त्व आहे. विक्री झाली नाही तर त्याचा आमच्या ताळेबंदावर वर्षभर परिणाम होऊ शकतो. 50 टक्के रिटेलर्सनी सांगितले की, यावर्षी आमची विक्री 25 टक्‍क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता आहे. 71 टक्के रिटेलर्सने सांगितले की आम्ही परिस्थितीचा अंदाज घेऊन याअगोदर दिलेल्या ऑर्डर रद्द किंवा स्थगित करण्याच्या विचारात आहोत.

जर  रिटेलर्सनी ऑर्डर रद्द केल्या तर सर्व पुरवठा साखळीवर परिणाम होणार आहे. रिटेलरच्या व्यवसायात भांडवलाची जास्त प्रमाणात गरज असते. जर हे भांडवल व्याजदरावर उभे केले तर इन्व्हेंटरी निर्माण होऊन सर्वच हिशेबावर परिणाम होऊ शकतो अशी भीती बऱ्याच रिटेलर्सनी व्यकक्‍त केली.
शहरातील परिस्थिती पूर्ववत्‌ नाही

भारतात जवळजवळ 50 टक्के लोक शहरात राहतात. शहरातील लोकांची खरेदी करण्याची क्षमता जास्त असते. मात्र, मोठ्या शहरांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. स्थानिक पातळीवर निर्बंध लावले जातात. त्यामुळे ग्राहकांची खरेदी करण्याची इच्छा राहिलेली नाही. फक्‍त खाण्यापिण्याच्या वस्तूवर ग्राहक सध्या लक्ष देऊन आहेत. त्यामुळे इतर वस्तूंच्या व्यापारावर अधिक परिणाम होत आहे. असे ब्ल्यू पाय या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणव चटर्जी यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.