गेल्या साडे पाच वर्षातील उच्चांकी दराची नोंद
नवी दिल्ली : डिसेंबर 2019 मध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर 7.35 टक्के राहिला. मुख्यत: कांदा महाग विकत असल्याने आरबीआयच्या सुरक्षित पातळीला मागे टाकत भाजीपाल्यांच्या किंमती वाढत आहेत.
राष्ट्रीय सांख्यकी कार्यालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर 2018 च्या तुलनेत भाजीपाल्याच्या महागाईचा दर 60.5 टक्के होता. डाळी व डाळींशी संबंधित उत्पादनांच्या महागाईचा दर 15.44 टक्के, तर मांस आणि मासे यांच्या महागाईचा दर जवळपास 10 टक्के होता.
ग्राहक दर निर्देशांकानुसार सर्वसमावेशक किरकोळ चलनवाढीचा दर डिसेंबर 2018 मध्ये 2.11 टक्के आणि नोव्हेंबर 2019 मध्ये 5.54 टक्के इतका होता. अन्नधान्यावर आधारित ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर डिसेंबर 2019 मध्ये 14.12 टक्के राहिला.
नोव्हेंबर 2019 मध्ये तो 10.01 टक्के होता. यापूर्वी जुलै 2014 मध्ये महागाईचा दर सर्वाधिक म्हणजे 7.39 टक्के इतका नोंदवला गेला होता. त्याच वर्षी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पहिल्यांदा सत्तेवर आले होते.
केंद्र सरकारने महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी 4 टक्क्यांची मर्यादा रिझर्व बॅंकेला दिली आहे. यामध्ये 2 टक्क्यांचे कमी अधिक प्रमाण स्वीकारार्ह्य आहे. रिझर्व बॅंकेचे द्वैमासिक पतधोरण 6 फेब्रुवारीला जाहीर केले जाणार आहे.