आरबीआयच्या पतधोरणांत 7 टक्के विकासदराचे भाकित
मुंबई – रिझर्व्ह बॅंकेने पतधोरण जाहीर करताना या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत महागाई वाढून ती 3 ते 3.1 टक्के राहील असे म्हटले आहे. त्यामुळे आगामी पतधोरणात व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. या वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यांत किरकोळ महागाई 3.4 ते 3.7 टक्के राहण्याची शक्यता आहे.
विकासदर कमी होणार
कमी झालेली खासगी गुंतवणूक, कमी झालेला कर्जाचा उठाव आणि जागतिक व्यापारयुद्ध या कारणामुळे या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर कमी होऊन सात टक्के होण्याची शक्यता असल्याचे रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे.
या अगोदर जाहीर करण्यात आलेल्या पतधोरणात रिझर्व्ह बॅंकेने विकासदर 7.2 टक्के राहील असे म्हटले होते. मात्र आता बॅंकेने म्हटले आहे की, पहिल्या सहा महिन्यांत विकासदर 6.4 ते 6.7 टक्के राहील तर दुसऱ्या सहा महिन्यांत हा दर 7.2 ते 7.5 टक्क्यांच्या दरम्यान राहील. विकासदराला वेग यावा यासाठी बॅंकांनी आपल्या कर्जावरील व्याजदरात शक्य तितक्या लवकर कपात करावी, अशी अपेक्षा रिझर्व्ह बॅंकेने व्यक्त केली आहे.