नवी दिल्ली – महागाई रोखण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने गेल्या दोन महिन्यांमध्ये तीन टप्प्यात 1.40% ची व्याज दरवाढ केली आहे. अर्थ मंत्रालयानेही महसुलातला कात्री लावून पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले आहे. त्याचा सकारात्मक परिणाम जाणवू लागला असल्याचे दिसून येत आहे. जुलैमधील किरकोळ किंमतीवर आधारीत महागाईचा दर कमी होऊन 6.71 टक्क्के इतका नोंदला गेला आहे.
चांगला पाऊस पडल्यामुळे आणि खरिपाची पेरणी वाढल्यामुळे अन्नधान्याच्या किमती कमी होऊ लागल्या असल्यामुळे एकूण महागाईच्या आकडेवारीवर सकारात्मक परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. भाज्या व खाद्यतेल झाले स्वस्त झाले आहे. जून महिन्यामध्ये किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर तब्बल 7.01% होता.
मात्र महागाई परतीच्या वाटेवर असली तरी अजूनही ती बरीच कमी होण्याची गरज आहे. रिझर्व्ह बॅंकेने किरकोळ किमतीवर आधारित मागायचा दर चार टक्क्याच्या आत रोखण्याचा संकल्प केलेला आहे. मात्र गेल्या सहा महिन्यापासून किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा जर सहा टक्क्यापेक्षा जास्त आहे.
दरम्यानच्या काळामध्ये जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर कमी होत आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये महागाई आणखी कमी होण्याची शक्यता आहे. या अगोदर जाहीर केलेल्या पतधोरणामध्ये रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ऑक्टोबर नंतर महागाई खऱ्या अर्थाने कमी होण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.
गेल्या आठवड्यामध्ये अमेरिकेतील महागाईचा दर कमी होऊन साडेआठ टक्के इतका झाल्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या महिन्यामध्ये अमेरिकेतील महागाईचा दर 9% पेक्षा जास्त झाल्यानंतर अमेरिकेसह अनेक देशांमध्ये नकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. मात्र अमेरिकेच्या रिझर्व्ह बॅंकेने महागाई रोखण्यासाठी गेल्या पाच महिन्यांमध्ये व्याजदरात तब्बल सव्वादोन टक्के वाढ केली आहे. त्यामुळे तेथील महागाई कमी होत आहे.
अमेरिकेतील महागाई कमी होत असल्याची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर अमेरिकेतील गुंतवणूक भारतामध्ये येत असल्यामुळे भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले आहेत. आता भारतातील महागाई कमी होत असल्याचे दिसून आल्यानंतर सोमवारी शेअर बाजारावर याचे सकारात्मक पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.