नवी दिल्ली – देशभरातील काँग्रेस नेत्यांच्या राजीनामा सत्रानंतर आता पुन्हा एकदा नव्याने काँग्रेसची बांधणी करण्यास सुरुवात झाल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. लोकसभा निवडणुकांमधील पक्षाच्या मानहानीकारक पराभवानंतर राहुल गांधी यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. राहुल गांधी यांच्या पाठोपाठ पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील आपल्या पदाचे राजीनामे दिले होते.
लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीमध्ये काँग्रेसचा लोकसभेच्या सातही जागांवर पराभव झाला होता. या पराभवानंतर दिल्ली काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षा तथा दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी दिल्ली काँग्रेस कार्यकारणी विसर्जित केली होती तसेच दिल्ली काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षांनी देखील राजीनामा दिला होता.
दरम्यान, काँग्रेसच्या दिल्ली प्रदेश अध्यक्षा शीला दीक्षित यांनी आज दिल्ली काँग्रेस कार्यकारिणीची पुर्नबांधणी केली असून त्यांनी आज १४ जिल्हा काँग्रेस समितीचे तर 280 ब्लॉक काँग्रेस समितीचे निरीक्षक नेमले आहेत.
पुढील वर्षी राज्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्या करण्यात आल्या असल्याने दिल्ली काँग्रेस पुन्हा एकदा नव्याने पक्ष बांधणी करताना दिसत आहे. देशभरातील अनेक काँग्रेस नेत्यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याने त्यांच्या जागा देखील रिक्त असून अशातच दिल्ली काँग्रेसची पुर्नबांधणी केली गेल्याने देशभरातील काँग्रेसची देखील पुर्नबांधणी लवकरच केली जाईल अशी चिन्हं दिसू लागली आहेत.
Delhi Pradesh Congress Committee President Sheila Dikshit has appointed 14 District Congress Committee Observers and 280 Block Congress Committee Observers. (file pic) pic.twitter.com/gSDB8rNmHu
— ANI (@ANI) July 12, 2019