19 हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

40 कोटींचे अमलीपदार्थ, 10 कोटींवर रोकड, 391 अवैध शस्त्र हस्तगत
मुंबई – लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहितेच्या काळात 19 हजारांहून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या काळात 40 कोटी रुपये किंतमीचे अंमलीपदार्थ, 10 कोटी रुपयांची रोकड आणि 391 अवैध शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. प्रतिबंधात्मक कारवायांची कठोर अंमलबजावणी केल्याने लोकसभा निवडणुकीसाठी 29 एप्रिल रोजी शहरात शांततापूर्ण आणि मोकळ्या वातावरणात मतदान पार पडेल, असा दावा मुंबई पोलिसांनी केला.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आचारसंहितेच्या काळात शहरातील अभिलेखावरील गुन्हेगारांसह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या 19 हजारांहून अधिक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यापैकी 204 जणांना शहरातून हद्दपार करण्यात आले. आठ हजार गुन्हेगार, गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांकडून फौजदारी दंड संहितेतील विविध तरतुदींनुसार हमीपत्र घेण्यात आले. पाच हजारांहून अधिक जणांना नोटीसा बजावून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

येत्या 29 एप्रिल रोजी होणाऱ्या मतदानासाठी शहर पोलीस दलातील 40 हजार 400 मनुष्यबळ बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. त्यासोबत निमलष्करी दलाच्या 14 तुकड्या, राज्य राखीव दलाच्या 12 तुकड्या आणि सहा हजार होमगार्ड पोलीस मनुष्यबळाच्या जोडीला बंदोबस्त ठेवणार आहेत, असे पोलीस प्रवक्ते मंजुनाथ सिंगे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मुंबई शहर, उपनगरांतील सहा मतदारसंघातील 1492 मतदान केंद्रांमधील 10073 बुथवर मतदान होणार आहे. मुंबईच्या शहर जिल्ह्यात दोन मतदारसंघ असून 527 मतदान केंद्र, 2601 बुथ तर उपनगर जिल्ह्यात चार मतदारसंघ असून 965 मतदान केंद्र, 7472 बुथ आहेत. शहर, उपनगर जिल्ह्यांतील एकही मतदान केंद्र असुरक्षित नाही, असा दावा पोलिसांनी केला. मात्र निवडणूक आयोगाच्या विविध निकषांमुळे 325 केंद्र संवेदनशील जाहीर करण्यात आली आहेत. त्यापैकी 60 उपनगरातील, तर उर्वरित शहरातील केंद्र असल्याचे सांगण्यात आले.


पैसे वाटणाऱ्या दोघांना अटक
कामोठे येथे पैसे वाटप करणाऱ्या दोघा कार्यकर्त्याविरुध्द सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, पनवेल यांनी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भरारी पथक क्रमांक 2 मधील प्रभाग अधिकारी व पथक प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे संदीप रामकृष्ण पराडकर, वैभव विठोबा पाटील अशी आहेत. या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 11 हजार 900 रुपये रोख, सत्यकुंज कॉम्प्लेक्‍स कामोठे येथे हाताने लिहिलेली मतदार यादी सापडली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.