नवी दिल्ली : दूरसंचार नियामकने डिसेंबर 2018 पासून प्रसारण आणि केबल संदर्भात नवीन नियमावली लागू केली आहे. त्यामुळे विविध वाहिन्या आणि डीटीएच कंपन्यांनी ग्राहकांना स्वतःकडे वळवण्यासाठी वेगवेगळ्या ऑफरची स्पर्धाच सुरू केली आहे. त्यामुळे आता चॅनेल्सकडून देण्यात येणाऱ्या या सवलतींवरही ट्राय बंधने आणणार आहे. त्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. तसेच सवलती, पॅकेज आणि सीलिंग प्राइस बाबत मते मागवली असल्याचे सांगण्यात येत आहे.
ट्रायने वाहिन्यांसाठी द्यावे लागणारे बिल नियंत्रित करण्यासाठी नवीन नियमांची अंमलबजावणी केली होती. नव्या नियमांनुसार वाहिनी निवडण्याचा अधिकार ग्राहकांना देण्यात आलेला आहे. मात्र, वाहिन्या आणि केबल चालकांनी इथेही स्पर्धा सुरू केली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या सवलतींचा ग्राहकांवर भडीमार सुरू केला आहे. यात ग्राहकांना नको असलेल्या वाहिन्याही पॅकेजमधून दिल्या जात आहे. याचेही पैसे द्यावे लागत असल्याने ग्राहकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे मत ट्रायने नोंदवले आहे. ट्रायने जारी केलेल्या नवीन नियमांमध्ये यासाठी कोणतीही बंधने वा संहितेचा समावेश केलेला नाही. त्यामुळे वाहिन्या आणि केबलच्या ऑफरवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रायने नवीन पाऊले उचलली आहेत.