- पी-1, पी-2 निर्बंध हटविल्याने व्यापाऱ्यांचे आंदोलन स्थगित
पिंपरी – करोनाला प्रतिबंध करण्यासाठी पिंपरी कॅम्पातील व्यावसायिकांसाठी 14 जूनपासून लागू केलेले पी-1, पी-2 धोरण महापालिका प्रशासनाने रद्द केले आहे. त्यामुळे या व्यापारीपेठेतील सर्वच दुकाने आजपासून पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहे. मात्र, दिवसभरात ग्राहकांची उसळलेली गर्दी पाहता, करोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत असल्याचे चित्र पिंपरी कॅम्पात पहायला मिळाले.
पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने पिंपरी कॅम्प मधील व्यापाऱ्यांवर पी- 1, पी- 2 प्रमाणे दुकाने सुरु ठेवण्यास 14 जूनपासून निर्बंध घातले होते. परंतु पिंपरी कॅम्प परिसरातील एका बाजुची दुकाने बंद असल्यास ज्या बाजूची दुकाने बंद असतात त्या बाजूला पथारीवाले दुचाकीवर वस्तू विक्रीची दुकाने थाटतात. यांच्यावर कारवाई करावी, अशी पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनने मागणी होती. तर मार्च 2020 पासून पिंपरी चिंचवड शहरात बहुतांश काळ लॉकडाऊन मुळे व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवावी लागली आहेत. जून महिन्यापासून अंशत: दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र महापालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांचा विरोध डावलून याठिकाणी पी-1, पी-2 प्रमाणे दुकाने उघडी ठेवण्याच्या निर्बंधाला विरोध होता. हे निर्बंध मागे घेण्यासाठी अनेकदा प्रशासनाशी पत्र व्यवहार केला. पिंपरी कॅम्पमधील व्यापारी आज (दि.21) दुपारी एक वाजता शगुन चौक येथे आंदोलन करणार होते.
दरम्यान, शहरात संसर्ग दर अधिक असतानादेखील सायंकाळी सात वाजेपर्यंत सर्व दुकाने खुली ठेवण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. दुकानांची वेळ वाढविण्यात आली असली, तरीदेखील ग्राहकांनी त्याकडे दुर्लक्ष करत, खरेदीसाठी पिंपरी कॅम्पात मोठी गर्दी केल्याचे चित्र सोमवारी (दि.21) पहायला मिळाले. दररोज याचप्रमाणात ग्राहकांची गर्दी होऊ लागल्यास, करोनाच्या तिसऱ्या लाटेला पिंपरी-चिंचवडकर आमंत्रण देत असल्याचे चित्र दिसत आहे.