- आयुक्तांचे आदेश
- शहराचा पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांपेक्षा अधिक
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट अद्याप पाच टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे शहरातील निर्बंध आणखी शिथील केले जाणार नसल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाचपेक्षा कमी पॉझिटिव्हीटी दर असलेल्या भागात निर्बध शिथील करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, पुणे शहरामध्ये निर्बंध शिथील केले जाणार असून दुकानांची वेळ वाढविण्यात येणार आहे. मात्र पिंपरी चिंचवड शहराचा पॉजिटिव्हीटी दर हा पाचपेक्षा अधिक आहे. त्यामुळे शहरातील निर्बंध शिथील न करता सद्यस्थितीत आहे तेच निर्बंध राहणार असल्याचे आयुक्त पाटील यांनी सांगितले आहे.
सद्यस्थितीत शहरातील बाधितांची दररोजची संख्या 250 ते 300 च्या घरात आहे. तर दररोज 15 ते 18 मृतांची नोंद होत आहे. शहरातील बाधितांचा आलेख खाली येत असल्याने मागील आठवड्यामध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आले. अत्यावश्यक सेवेबरोबरच इतर दुकाने देखील सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी देण्यात आली. मात्र निर्बंध शिथील केल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर बाजारपेठेमध्ये गर्दी केली आहे. तसेच नियम पाळण्याकडेही दुर्लक्ष केले आहे. पुणे शहरातील बाधितांचा पॉझिटिव्हीटी दर पाचपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात निर्बंध शिथील करण्यात आले आहे. तर, पिंपरी चिंचवड शहरातील पॉझिटिव्हीटी दर पाचपेक्षा जास्त असल्याने निर्बंध आहेत तसेच ठेवण्यात येणार आहेत.
निर्बंध शिथील केल्यानंतर रुग्णसंख्येत वाढ
1 जूनला 286 बाधितांसह पॉझिटिव्हीटी दर 7.26 टक्के होता. तर, 4 व 5 जून रोजी पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांपेक्षा कमी झाला होता. या दिवशी अनुक्रमे 3.54 व 4.43 टक्के असा पॉझिटिव्हीटी रेट होता, तर रुग्णसंख्या दोनशेच्या आत होती. 6 जूनला त्यामध्ये पुन्हा वाढ होऊन पॉझिटिव्हीटी दर 5.31 टक्के इतका झाला. शहरातील निर्बंध शिथील केल्यानंतर या आठवड्यात रुग्णसंख्येत पुन्हा किंचित वाढ झाली. आठवड्यातील दोन दिवस रुग्णांची संख्या 300 हून अधिक झाली होती. तर पॉझिटिव्हीटी दर दररोज पाच टक्क्यांपेक्षा अधिक आहे. सद्यस्थिती शहरतील पॉझिटिव्हीटी दर हा 5.2 टक्के आहे. पुणे शहरात निर्बंध शिथील केल्याने दुकाने उघडे ठेवण्याची वेळ वाढविण्यात आली आहे. मात्र पिंपरी चिंचवड शहरात मागील नियमाप्रमाणे शहरातील दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर शनिवार व रविवारी इतर दुकाने पूर्णतः बंद ठेवण्यात येणार असून यादिवशी फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्यास मुभा असणार आहे.
गर्दीने वाढतेय धास्ती
पिंपरी चिंचवड शहरामध्ये सोमवार (दि.7) पासून निर्बंध शिथील करण्यात आले. त्यामध्ये इतर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर नागरिकांनी बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. तसेच करोनाच्या नियमांकडेही दुर्लक्ष केले आहे. तसेच मागील आठवड्यामध्ये दररोजची रुग्णसंख्या दोनशेच्या जवळ आली होती. ती या आठवड्यामध्ये दोनदा तीनशेहून अधिक झाली. त्यामुळे शहरातील नागरिक करत असलेली गर्दी चिंतेचा विषय ठरली आहे.
पिंपरी चिंचवड शहराचा पॉझिटिव्हीटी दर पाचपेक्षा जास्त असून तो सद्यस्थितीत 5.2 टक्के इतका आहे. ज्याठिकाणी हा दर पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्याठिकाणी फक्त निर्बंध शिथील केले जाणार आहे. आपल्याकडे हा दर अधिक असल्याने किमान या आठवड्यापुरते तरी पिंपरी-चिंचवड शहरात पहिलेच नियम लागू असतील. पुणे शहरात निर्बंध शिथील केले असले तरी पिंपरी चिंचवड शहराला सद्यस्थितीत ती सूट देण्यात येणार नाही.
– राजेश पाटील, आयुक्त