सातारा जिल्ह्यातील यात्रांवर प्रतिबंध

जिल्हाधिकारी शेखर सिंह; सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश

सातारा – करोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील यात्रा, महोत्सव तसेच गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर प्रतिबंध घालण्यात आला असून जिल्ह्यातील यात्रा आणि जत्रांमधील धार्मिक कार्यक्रम संबंधित देवस्थानच्या पुजाऱ्यांनी करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज केले.

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील एकनाथसष्टी यात्रा तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा येथील येडेश्‍वरी देवीची यात्रा इत्यादी धार्मिक महोत्सव तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहेत. याच पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यातील यात्रा, महोत्सव तसेच गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.

यात्रा, सामुदायिक कार्यक्रम, मोहिमा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करा. लोकांना प्रशिक्षित करा. करोनाच्या संशयित रुग्णांची ओळख, त्यांचे विलगीकरण या बाबींवर भर द्यावा. शहरातील पर्यटन कंपन्यांना पुढील काही दिवस बुकिंग न करण्याच्या सूचना द्या. सार्वजनिक स्वच्छतागृह, सार्वजनिक जागी स्वच्छता ठेवा.

जे या सूचनांचे पालन करणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागीय आयुक्त आणि राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आज केल्या आहेत.
घंटागाड्यांवरुनही करोनाबाबतची जनजागृती
करोनाचा संसर्ग आजाराबाबत घ्यावयाची काळजी या संदर्भात जनजागृती करण्याच्या सूचना सर्व नगरपालिका व नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिल्या होत्या.

या अनुषंगाने आज सर्व नगरपालिका व नगरपंचायतींच्या कचरा उचलणाऱ्या घंटागाड्यांवरुन करोनाची धून आज सकाळी नागरिकांना ऐकू येत होती. या अभिनव उपक्रमातून जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात करोनाबाबतची जनजागृती करण्यात येत आहे.

हॉटेल, ढाबे यांनाही सूचना
सर्व हॉटेल, लॉज, ढाबे यामध्ये येणाऱ्या नागरिकांचे बसण्याचे टेबल, नेहमी हाताळणारे मेनू कार्ड, वॉश बेसीन, वॉश बेसीनचे नळ, शौचालय तसेच ज्या ठिकाणी नागरिकांचा हाताचा स्पर्श होऊन संसर्गजन्य रोगाचा प्रादुभाव वाढण्याची शक्‍यता आहे, या सर्व बाबी दिवसातून वारंवार निर्जुंतुकीकरण करण्यात यावे.

तसेच हायवेलगत राज्याबाहेरील किंवा देशाबाहेरील येणाऱ्या प्रवाशांची लॉजच्या रजिस्टरमध्ये नोंदणी करावी. परदेशी नागरिक अथवा करोनाबाधित संशयित नागरिक आढळल्यास तात्काळ आरोग्य व पोलीस विभागास कळविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यातील सर्व हॉटेल चालकांना दिल्या आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.