करोनामुळे कर्मचारी भरतीवर निर्बंध

नव्या आकृतिबंधास अटी : आऊटसोर्सिंगची परवानगी

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्या आकृतीबंधास राज्य शासनाने अटींवर परवानगी दिली आहे. त्यामध्ये थेट भरती न करता आऊटसोर्सने पदे भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यास सुरूवात केली आहे.

महापालिकेचा वर्ग “ब’ मध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे पालिकेने नव्याने आकृतीबंध तयार केला आहे. त्यामध्ये आवश्‍यकतेनुसार सर्व विभागांमध्ये पदांची वाढ करण्याचे सुचविण्यात आले आहे. महापालिकेने मंजुरीसाठी आकृतीबंध जुलै 2016 मध्ये राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यासंदर्भात अनेकवेळा पत्रव्यहार करण्यात आला आहे. त्यानंतर संपूर्ण आकृतीबंधास परवानगी न देता अत्यावश्‍यक सेवेतील 393 पदे भरण्यास राज्य शासनाने परवानगी दिली. त्यामध्ये अग्निशामक, आरोग्य विभागातील पदांचा समावेश आहे. मात्र या पदांची थेट भरती करण्यास अटकाव केला आहे. ही पदे आउटसोर्सने भरण्याची सूचना केली आहे. मात्र करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासनाने भरती प्रक्रिया थांबवली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने वैद्यकीय सेवेसाठी हंगामी तत्वावर डॉक्‍टर, परिचारिका व इतर पदांची भरती केली आहे. महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीची अर्हता पूर्ण केली असेल तर त्यांना पदोन्नती देण्यात येत आहे.

पालिका प्रशासनातील अनेक अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या जागेवर मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याने त्याची कमतरता महापालिकेला जाणवत आहे. राज्य शासनाने पदे तत्वतः भरण्यास मंजुरी दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.