अडथळा ठरणाऱ्या कामांना बंदी

रॅम्पच्या परिसरातील कामे थांबवावी लागणार
“एचसीएमटीआर’ मार्गिका : आयुक्‍तांच्या विभाग प्रमुखांना सूचना

पुणे – शहरातील सार्वजनिक वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी “एचसीएमटीआर’ या
36 किमी वर्तुळाकार उन्नत मार्गाच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या मार्गिकेस अडथळा ठरेल असे कुठलेही नवीन काम करू नये, असे आदेश नुकतेच महापालिका आयुक्‍त सौरभ राव यांनी सर्व विभागप्रमुखांना दिले आहेत.

महापालिकेच्यावतीने शहरांतर्गत वाहतूक सुरळीत करण्यासाठी 36 किमी लांबीचा उन्नत वर्तुळाकार मार्ग उभारण्यात येणार आहे. ही मार्गिका 24 मीटर रुंद असून त्यावर 6 लेन असतील. त्यापैकी 2 लेन या “बीआरटी’साठी व 4 लेन या खासगी वाहनांसाठी असतील. या प्रकल्पास 1987 च्या विकास आराखड्याच्यावेळेसच मान्यता देण्यात आली आहे. मात्र, या प्रकल्पासाठी येणारा मोठा खर्च आणि काही तांत्रिक बाबींमुळे काम रखडले होते. परंतु, सध्याच्या शासनाने विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “एचसीएमटीआर’ प्रकल्पास प्राधान्य दिले असून त्याच्या उभारणीसाठी पावलेही उचलली आहेत.

प्रकल्प उभारण्याच्या दृष्टीने महापालिकेने “स्तूप’ कन्सल्टंट यांच्यामार्फत या प्रकल्पाचा अंतिम सुसह्य अहवाल (फिजीबिलीटी रिपोर्ट) तयार करून घेतला आहे. याला सर्वसाधारण सभेनेही मान्यता दिली आहे. त्यानुसार आंतरराष्ट्रीय पातळीवर निविदाही मागविण्यात आल्या आहेत. या निविदांची तांत्रिक छाननी सध्या सुरू आहे.

या निविदांमध्ये “एचसीएमटीआर’ मार्गीकेनुसार अटी व शर्ती टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे या मार्गिकेस अडथळा ठरेल असे नवीन काम केल्यास प्रकल्पास अडचण होणार आहे. तसेच, या प्रकल्पाच्या मार्गिकेमध्ये कोणताही बदल करायचा झाल्यास आर्थिक व कायदेशीर बाबींनुसार प्रकल्प राबविण्यामध्येही अडचणी निर्माण होवू शकतात. यासाठीच कुठल्याही खात्याने या मार्गिकेवर कोणत्याची खात्यार्मात नवीन प्रकल्पाचे काम करण्यात येऊ नये. परंतु, नव्याने करण्यात येणाऱ्या कामाची गरज लक्षात घेवूनच आवश्‍यक मान्यता घेऊनच पुढील कारवाई करावी, असे सौरभ राव यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

“एचसीएमटीआर’ हा उन्नत मार्ग उपनगरांतील बहुतांश अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरच होणार आहे. आयुक्‍तांनी सादर केलेल्या 2019-20च्या अंदाजपत्रकामध्ये या मार्गिकेवर कुठेलीही नवीन कामे सुचविलेली नाहीत. मात्र, स्थायी समितीने सादर केलेल्या आणि सर्वसाधारण सभेने मंजुर केलेल्या अंदाजपत्रकामध्ये मात्र पदाधिकारी आणि नगरसेवक स्थानिक गरजेनुसार उड्डाणपूल, भुयारी मार्ग, पादचारी मार्गाची कामे सूचवत असतात. तसेच रस्ते, पावसाळी गटारे, फूटपाथ अशीही कामे सूचवत असतात. आयुक्‍तांच्या या आदेशामुळे किमान “एचसीएमटीआर’ मार्गिका व यासाठी तयार करण्यात येणाऱ्या रॅम्पच्या परिसरातील कामे थांबवावी लागणार आहेत.

या आहेत, कृती समितीच्या प्रमुख मागण्या
मेट्रो आणि ‘एचसीएमटीआर’चा एकत्रित वाहतूक संदर्भाने अभ्यास व्हावा.
पर्यावरण खात्याच्या मान्यताप्राप्त तज्ज्ञांकडून पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामाचा अभ्यास केला जावा.
सामाजिक दुष्परिणामांचा अभ्यास व्हावा.
पुणे विद्यापीठ आणि पौड फाटा जंक्‍शन येथे मेट्रो, फ्लाय ओव्हर, एलेव्हेटेड ‘एचसीएमटीआर’ सगळेच उभारले जाणार असल्याचे नियोजन योग्य आहे का? या सर्व प्रकल्पांच्या नियोजनाचे नकाशे समितीला मिळावेत. दोन आठवड्यात आयुक्‍त-महापौर-स्थायी समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत जनसुनावणी घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)