- हॉटेल, दुकानांची वेळ वाढवली
- वीकेंड लॉकडाऊऩ कायम राहणार
पिंपरी – गेल्या आठवड्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहरात करोना संसर्ग दर अधिक असतानाही शहरातील निर्बंध आणखी शिथील करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे
पुणे शहराप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमधील दुकाने सायंकाळी सात आणि हॉटेल, रेस्टॉरेंट आणि बार रात्री दहा वाजेपर्यंत खुले राहणार आहेत. उल्लेखनीय बाब अशी की गेल्या आठवड्यात जेव्हा पुण्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले होते, तेव्हा पिंपरी-चिंचवडमधील करोना पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजे 5.2 टक्के इतका होता. यामुळे पिंपरी-चिंचवडमधील निर्बंध शिथिल करण्यात आले नव्हते. या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी होण्याऐवजी वाढून 5.18 टक्क्यांवर पोहचलेला असतानाही निर्बंध मात्र शिथिल करण्यात आले आहेत.
पिंपरी चिंचवड शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांचा आलेख खाली येत आहे. मागील आठवड्यातील पॉझिटिव्हिटी रेट हा पाचपेक्षा अधिक आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून शहरातील बाधितांची संख्या दोनशेच्या खाली आली आहे. तसेच मृतांचीही संख्या कमी झाली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी निर्बंध शिथील करण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. शहरातील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. तसेच रेस्टॉरंट, बार 50 टक्के क्षमतेने रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. शनिवार व रविवारी वीकेंड लॉकडाऊऩ कायम ठेवण्यात आला आहे.
महापालिका क्षेत्रातील करोना पॉझिटिव्हीटी दर व ऑक्सिजन बेड ऑक्युपेन्सी यांची टक्केवारी विचारात घेऊऩ निर्बंध शिथील करण्यात आले आहे. यामध्ये वाढ झाल्यास निर्बधांमध्ये बदल करणार असल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
अशी दिली मुभा
महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यानुसार सोमवारपासून (दि. 21) याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दुकाने व हॉटेल यांची वेळ वाढविण्यात आली आहे. रात्री दहा वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवागी आहे. त्यानंतर रात्री 11 वाजेपर्यंत घरपोच पार्सल सेवा देण्यास मुभा देण्यात आली आहे. सर्व आउटडोअर व इनडोअर खेळांना सकाळी 5 ते 9 व सायंकाळी 4 ते 7 मुभा असेल. लग्नासाठी 50 व अंत्यसंस्कार, दशक्रिया यासाठी 20 लोकांच्या उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शहरातील नाट्यगृहे, सिनेमागृहे बंदच ठेवण्यात येणार आहे. तसेच शहरामध्ये पाच पेक्षा जास्त नागरिकांना एकत्र फिरण्यास बंदी आहे. रात्री 10 वाजल्यानंतर संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे.
हे सुरू राहणार
1) सार्वजनिक वाचनालय सुरू राहतील
2) स्पर्धा परीक्षा, कोचिंग क्लास, अभ्यासिका, ग्रंथालय, प्रशिक्षण संस्था क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील
3) मॉल, व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, स्पा 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी
4) मद्य विक्रीची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस सुरू
5) रेस्टॉरेंट, बार, फूड कोर्ट सोमवार ते शुक्रवार रात्री 10 वाजेपर्यंत
6) उद्याने, खुली मैदाने, सायकलिंगसाठी परवानगी
हे बंद राहणार
1) सिनेमागृह, नाट्यगृह बंद राहतील
2) शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील