प्रशासनाकडून केटरिंग व्यावसायिकांवरही निर्बंध
पुणे – दिवसेंदिवस करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता लग्न समारंभात होणारी गर्दी कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडून कडक निर्बंध लावले आहेत. त्याचबरोबर दिलेल्या सूचनांचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाईबरोबरच आवश्यकता भासल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये नियमांचे उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालये, हॉल यांच्या मालकांबरोबरच आता केंटरिंग व्यावसायिकांवरही कारवाई होणार आहे. केंटरिंग व्यावसायिकांनी जास्तीत जास्त 50च्या मर्यादेत ऑर्डर स्वीकाराव्यात. 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास केंटरींग व्यावसायीकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
ग्रामीण भागातील करोनाची स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. सद्य:स्थितीत गर्दीच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले असून मर्यादेत संख्येमध्येच लग्न समारंभ अथवा इतर राजकीय -सामाजिक कार्यक्रम करण्याचे आदेश आहेत. मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ऑक्सिमीटर, इन्फ्राथर्मामीतरचा वापर करण्यात या
वा. तसेच उपस्थितांचे नाव, मोबाइल क्रमांक व स्वाक्षरी घेण्यात यावी. तसेच, लग्न समारंभाची सीडी तीन दिवसांत संबंधीत पोलीस स्टेशनकडे जमा करण्यात यावी. ही सीडी जमा न केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच लग्न समारंभात सर्व नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक आहे.
…तर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचा निर्णय असणार अंतिम
लग्न समारंभाकरिता जास्तीत जास्त 50 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. लग्न समारंभासाठी संबंधीत पोलीस स्टेशनने 6 तासांत परवानगी द्यावी. परवानगी न दिल्यास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे अपिल दाखल करावे. उपविभागीय अधिकारी यांनी 24 तासांत निर्णय घ्यावा. परवानगीबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा निर्णय अंतिम राहिल, असे जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.