पुण्यात करोना रोखण्यासाठी निर्बंध आवश्यकच, वाचा “आयसर’ व “टाटा’ संस्थेच्या उपाययोजना

पुणे – करोना बाधितांचा वाढता आलेख कमी करण्यासाठी “आयसर’ (Indian Institute of Science Education and Research, Pune) व “टाटा’ संस्थेने उपाययोजना सूचवल्या आहेत. यात प्रामुख्याने गर्दी होणाऱ्या प्रमुख घटकांवर लक्ष देण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये दोन महिन्यांपर्यंत प्रायोगिक तत्वावर बंद ठेवली, तर करोनाच्या संख्येत 35 टक्के घट होईल. जर रेस्टॉरंट, मॉल आणि बार बंद ठेवले तर बाधितांची संख्या 20 टक्क्यांनी कमी होईल. जर रेस्टॉरंटमधून पार्सल सुविधा उपलब्ध करून दिली तर करोना बाधितांच्या संख्येत 15 टक्क्यांनी घटेल, अशा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

 

करोना बाधितांची संख्या मागील महिनाभरापासून वाढत आहे. त्यामुळे दि.22 फेब्रुवारीपासून शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला. तसेच हॉटेल व्यावसायिकांना हॉटेल रात्री 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. याचसह रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना संचारबंदी लागू करण्यात आली. एका बाजूला तातडीची ही उपाययोजना लागू असताना, बाधितांची संख्या वाढण्यामागील कारणांचा शोध घेण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले. त्यासाठी या दोन्ही संस्थांना सविस्तर अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

 

 

जम्बो हॉस्पिटल भक्कम आणि सुस्थितीत

शिवाजीनगर येथील जम्बो हॉस्पिटलचे स्ट्रक्चरल आणि इलेक्ट्रिक ऑडिट करण्यात आले आहे. यामध्ये उभारण्यात आलेले जम्बो हॉस्पिटल भक्कम आणि सुस्थितीत आहे. त्यामुळे पुढील तीन महिने हे हॉस्पिटल चालविण्यास काहीही अडचण नाही. तसेच जम्बो हॉस्पिटलचे महिन्याचे भाडे हे सुमारे 5 कोटी रुपये होते. यामध्ये संबधित व्यक्तीने ना-नफा-तोटा या तत्वावर भाडे आकारण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे जम्बो हॉस्पिटले भाडे हे सुमारे 1 कोटी 90 लाख इतके असणार आहे. याचसह पुढील काळात जम्बो हॉस्पिटल सुरु करायची आवश्यकता भासल्यास मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी पुणे महापालिकेला टेंडर काढण्याच्या प्रक्रियेला मान्यता दिली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

 

 

लसीकरणाचाही अभ्यास

सध्या करोना प्रतिबंधक लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. या मोहिमेचा करोना संक्रमणावर थेट परिणाम काही होतो का, लसीकरणामुळे नव्या बाधितांच्या संख्येमध्ये घट होते का, याचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यावरच पुढील प्रशासकीय निर्णय अवलंबून असतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.