नेपाळमधील सेतू मच्छिंद्रनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारास सुरूवात

काठमांडू – नेपाळमधील पुरातन सेतू मच्छिंद्रनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी आज भूमिपूजन झाले. नेपाळमधील भारताचे राजदूत विनय मोहन क्‍वात्रा, राष्ट्रीय पुननिर्माण प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुशिल गयावली आणि काठमांडूचे महापौर बिद्या सुंदर शाक्‍य यांच्या उपस्थितीत पुननिर्माण होत असलेल्या या मंदिराचे भूमिपूजन झाले.

या प्रसंगी वरिष्ठ सरकारी अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, भारतीय दूतावासातील फेरनिर्माण प्राधिकरणाचे अधिकारीही उपस्थित होते. नेपाळमधील सांस्कृतिक वारसा असलेल्या 28 वास्तूंच्या जीर्णोद्धाराचे काम भारत सरकारने हाती घेतले आहे. त्यासाठी 5,800 दशलक्ष नेपाळी रुपयांचे योगदान भारत सरकारकडून दिले जाणार आहे. त्या फेरनिर्माण योजनेतील एक भाग म्हणून सेतू मच्छिंद्रनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला जात आहे.

नेपाळमधील संस्कृती जतन करण्यासाठी सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तूंचे फेरनिर्माण आणि जीर्णोद्धार करण्याच्या कामी योगदान देण्यास भारत सरकारला विशेष आनंद होत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. जीर्णोद्धार करायच्या सर्व 28 ठिकाणांची निवड नेपाळ सरकारने केली असून जीर्णोद्धाराच्या कामासाठी नेपाळ आणि भारतामध्ये 2017 च्या ऑगस्ट महिन्यात एक सामंजस्य करारही केला गेलेला आहे.

नेपाळच्या पुरातन वास्तू संवर्धन कायद्यांतर्गत पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणेच मच्छिंद्रनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला जाणार आहे. नेपाळमध्ये 2015 साली झालेल्या भूकंपानंतर पुरातन वास्तूंच्या जीर्णोद्धारासाठी करण्यात आलेल्या नियमांचे त्यासाठी काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. मूळ वास्तूच्या बांधकाम साहित्याचाच फेरनिर्माणासाठी वापर केला जाणार आहे.

मच्छिंद्रनाथांचे मंदिर 10 व्या शतकात मल्ल काळात बांधले गेले होते. मात्र 2015 च्या भूकंपात त्याची पडझड झाली होती. या मंदिराला हिंदू आणि बौद्ध भाविक मोठ्या संख्येने भेट देत असतात. नवनाथांपैकी एक असलेले मच्छिंद्रनाथ हे काठमांडू खोऱ्याचे संरक्षक समजले जातात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.