पुणे – सर्वाधिक क्षमता असलेल्या 6 कोविड केंद्रांची जबाबदारी आता आरोग्य विभागाकडील वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सोपवली आहे. आयुक्त शेखर गायकवाड यांनी रविवारी या केंद्रांची पाहणी केली. त्यावेळी या केंद्रावर वैद्यकीय उपचारासह अनेक प्रकारच्या तक्रारी या ठिकाणचे कर्मचारी तसेच रुग्णांकडूनही केल्या. त्याची गंभीर दखल घेत या अधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे.
महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार, या केंद्रांचे काम सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत, डॉ. अंजली साबणे, डॉ. वैशाली जाधव, डॉ. संजीव वावरे, डॉ. मंजूश्री नाईक तसेच, डॉ. केतकी घाडगे यांच्याकडे सोपवले. या अधिकाऱ्यांनी या केंद्रांना रोज भेटी द्यायच्या असून त्यांचा पूर्ण क्षमतेने वापर करणे तसेच वैद्यकीय अडचणी सोडवून त्याचा अहवाल दररोज सादर करणे बंधनकारक आहे.