मोना स्कूलच्या 50 विद्यार्थ्यांचा सहभाग; सहा विद्यार्थांच्या मूर्ती ठरल्या सर्वोत्कृष्ट
सातारा (प्रतिनिधी) – पुणे येथील श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट व दैनिक प्रभात यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “ग्रीन गणेशा’ उपक्रमाला साताऱ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोना स्कूलच्या पन्नास विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. त्यातील सहा विद्यार्थ्यांच्या मूर्ती सर्वोत्कृष्ट ठरल्या आहेत.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट व दै. प्रभात यांच्यावतीने आयोजित होणाऱ्या “ग्रीन गणेशा’ या उपक्रमाचे यंदाचे दुसरे वर्ष आहे. पुणे शहरात या उपक्रमाला शाळांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. “प्रभात’च्यावतीने ग्रीन गणेशा ही संकल्पना सातारा शहरातही राबवण्यात आली. दै. प्रभातच्यावतीने शहरातील नामांकित मोना स्कूलमध्ये ग्रीन गणेशा संकल्पनेस प्रतिसाद मिळाला. प्राचार्य फेरीडॉन तगावी व कलाशिक्षक दीपाली लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली 50 विद्यार्थ्यांनी या अनोख्या उपक्रमात सहभाग नोंदवला.
दै. प्रभातचे वरिष्ठ विपणन प्रतिनिधी प्रशांत कुलकर्णी यांनी या उपक्रमास सहकार्य केले. विद्यार्थ्यांना श्रींच्या मूर्ती साकारण्यासाठी मातीचे गोळे देण्यात आले होते. या विद्यार्थ्यांनी सुंदर श्री मूर्ती स्वहस्ते घडवून आपल्यातील कलेचा सुंदर नमुना पेश केला. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतींमुळे श्री मूर्तीचे दालनच तयार झाले. दीपाली लोहार यांनी परीक्षण करून सहा विद्यार्थ्यांच्या मूर्तींची सर्वोत्कृष्ट म्हणून निवड केली.
प्राचार्य तगावी यांनी या उपक्रमाचे कौतुक करून सर्वोत्कृष्ट मूर्ती घडवणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांची उपक्रमशीलता जोपासण्यासाठी आणि कलाविष्काराला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी दै. प्रभात व भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून हा सर्जनशील उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पुढील वर्षी सातारा शहरात आणखी व्यापक प्रमाणात हा उपक्रम राबवणार असल्याचे प्रशांत कुलकर्णी यांनी सांगितले.