आतापर्यंत 1 हजार 403 जणांनी घेतला लाभ
पुणे – लॉकडाऊन काळात सुरू केलेल्या ई-संजीवनी ऑनलाइन मोफत ओपीडी सेवेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील 1 हजार 403 नागरिकांनी लाभ घेतला. त्यामुळे या सेवेचा आता मोबाइल अप तयार होणार आहे.
लॉकडाऊन काळात खासगी रुग्णालयासह क्लिनिक बंद असल्यामुळे नागरिकांना वैद्यकीय सल्ला मिळावा यासाठी ही सेवा सुरू केली. राज्यातील जिल्हा रुग्णालयातील 16 वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑनलाइन ओपीडी सेवेचे प्रशिक्षण दिले आहे. सध्या मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या महानगरांमधून या ऑनलाइन ओपीडी सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
राज्यात एप्रिलमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेली ही सेवा मे महिन्यात पूर्णपणे सुरू केली. त्यासाठी संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते.
या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून एखादा रुग्ण राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉपचा वापर करून कोणत्याही आजारावर सल्ला विचारू शकतात. या सेवेचे मोबाइल ऍप तयार झाल्यावर त्याचा सामान्यांकडून वापर अधिक प्रमाणात वाढेल. त्यावेळेस आवश्यकता भासल्यास डॉक्टरांची संख्या वाढविता येईल. तसेच, तज्ज्ञांच्या सेवांसाठी विशिष्ट वेळ दिली जाईल, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचा संयुक्त उपक्रमात ऑनलाइन ओपीडी सकाळी 9.30 ते दुपारी 1.30 या काळात उपलब्ध आहे. ही सेवा रविवारी उपलब्ध नसते.
अशी आहे ई-संजीवनी ओपीडीची सेवा
मोबाइल क्रमांकद्वारे नोंदणी केल्यावर “ओटीपी’ येतो. त्या माध्यमातून नोंदणी अर्ज भरायचा. त्यानंतर टोकनसाठी विनंती केल्यानंतर आजारासंबंधी काही कागदपत्रे, रिपोर्ट अपलोड केले जातात. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाला ओळखक्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होतो. लॉगइनसाठी एसएमएसद्वारे नोटीफिकेशन येते. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळखक्रमांकाच्या आधारे लॉगइन करता येते. वेंटीग रुमवर एन्टर केल्यानंतर काही वेळातच “कॉल नाऊ’ हे बटण कार्यान्वित (ऍक्टिवेट) होते. त्यानंतर व्हीडओ कॉलद्वारे डॉक्टरांशी चर्चा केली जाते आणि चर्चेनंतर ई-प्रिस्क्रीप्शन प्राप्त होते.