समर्थकांच्या उपस्थित भरणे यांची घोषणा : जातीपातीच्या विषारी प्रचाराला बळी पडू नका
रेडा(प्रतिनिधी):इंदापूर तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी तब्बल चौदाशे कोटीचा निधी सरकार कडून खेचून आणला आहे. त्यामुळे गावागावात विकासाची गंगा पोहचलेली आहे. विना शिफारशीची कामे करणारा आमदार तालुक्यातील जनतेने अनुभवला आहे. त्यामुळेच जनतेचे प्रेम माझ्या पाठीशी कायम राहिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माझ्या उमेदवारीची घोषणा केली त्यामुळे पक्षाचा व मतदारांच्या भावनेचा आदर करून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची ग्वाही आमदार दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी दिली.
भरणेवाडी येथे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीच्या मतदारांनी “भरणे मामा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देत उमेदवारी अर्ज दाखल करा असा नारा दिल्याने चक्क आमदार दत्तात्रय भरणे यांना उद्याच उमेदवारी दाखल करतो, असे आश्वासन नागरिकांना द्यावे लागले.
यावेळी छत्रपतीचे संचालक अभिजित रणवरे,रणजीत निंबाळकर,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,वीरसिंह रणसिंग, रत्नाकर मखरे, लक्ष्मणराव शिंगाडे, डी.एन.जगताप, भारत जगताप,दत्तात्रय घोगरे, हनुमंत कोकाटे, बाळासाहेब करगळ, तुकाराम बंडगर, जिल्हा परिषद सदस्य वैशाली पाटील, हनुमंत बंडगर, विक्रम निंबाळकर, बाळासाहेब पाटील, विजय घोगरे, श्रीकांत बोडके, अल्पसंख्यांक सेलचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रियाज शेख, इंदापूर शहर अध्यक्ष अनिल राऊत,पोपट शिंदे, अतुल झगडे,सचिन. आदी उपस्थित होते.
भरणे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत आपल्याजवळचा मतदार राजा आपल्याला कधीही दगा देऊ शकत नाही तरीदेखील विरोधी उमेदवार हे जातीपातीचा विषारी प्रचार करतील, या विषारी प्रचाराला जनतेने थारा देऊ नये. सोशल मीडियाद्वारे विरोधक अफवांचे पेव पसरतील या अफवांवर तालुक्यातील जनतेने विश्वास ठेवू नये, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक घराचा उंबरा मत मागण्यासाठी झिजवा असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
उद्या माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित राहणार आहेत अशीही माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
” उपस्थितांकडून हात उभे करून उमेदवारी भरण्यासाठी पाठिंबा ”
गुरुवार रोजी सकाळी आठ वाजल्यापासून भरणेवाडी येथील आमदार दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मतदारांनी मोठी गर्दी केली होती, आमचा वाघ हाय वाघ, ओन्ली मामा, अशा घोषणा देण्यात येत होत्या. तालुक्यातील उपस्थित असलेल्या मतदारांना नागरिकांना प्रतिक्रिया देण्यासाठी आमदार दत्तात्रय भरणे उभे राहिलेले अन् मी उमेदवारी अर्ज भरू का ? जर आपण हात उभे करून उमेदवारी अर्ज दाखल करा असे सांगितले, तरच उमेदवारी दाखल करील असे आमदार भरणे बोलताच हजारो हात उभे करून आमदार दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारी भरावी असा पाठिंबा दिला.