पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील पक्षात प्रवेश करणार असल्याने, त्यांच्याबरोबर एकत्रित काम करण्याची संधी मिळत आहे. मात्र, पक्षफुटीच्या पहिल्या दिवसापासून पक्षाच्या पाठिशी उभे राहिले आहेत त्यांचा मान, सन्मान राखला जाईल,
ही माझी नैतिक जबाबदारी असून त्यांच्यावर अन्याय होणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट करीत निष्ठावंत कार्यकर्त्यांची पाठराखण केली.
माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. पाटील यांच्या पक्षप्रवेशाने विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून नाराजी होत आहे.
पाटील यांच्या उमेदवारीला पक्षातील कार्यकर्त्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. सुळे म्हणाल्या की, पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबीयांचे सहा दशकांपासून जवळचे संबंधित आहेत. आमच्यात यापूर्वी राजकीय भूमिका वेगळ्या होत्या. मात्र, कौटुबिक स्तरावर कधीच कटुता नव्हती.
पाटील यांच्या प्रवेशाला विरोध होत आहे का, या प्रश्नांवर सुळे म्हणाल्या की , पक्षाच्या संघर्षाच्या काळात पहिल्या दिवसांपासून जे सोबत होते, अशा कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा पक्षात योग्य सन्मान राखला जाईल, ही माझी जबाबदारी आहे.
त्यामुळे पाटील यांच्या पक्ष प्रवेशाने कुणावरही अन्याय होणार नाही, हा माझा शब्द आहे. राज्यात महागाई, बेकारी, मुलींचे संरक्षण याबाबत महायुतीचे सरकार अपयश ठरले असून, त्यांना आता पदावर राहण्याचा अधिकार नाही, अशी टीकाही सुळे यांनी यावेळी केली.