मुंबई – फादर स्टॅन स्वामी हे एक सुंदर व्यक्तीमत्व होते. त्यांच्या कार्याविषयी न्यायालयाला आदर आहे, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने आपले मत व्यक्त केले.
भीमा कोरेगाव प्रकरणात स्वर्गीय स्टॅन स्वामी यांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली. त्यावेळी न्यायालयाने हे मत व्यक्त केले. न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. इनामदार यांच्या खंडपीठाने हे मत व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे, याच खंडपीठासमोर स्वामी यांच्या वैद्यकीय जामीनाची सुनावणी झाली होती आणि त्यांच्या मृत्यूची माहिती होली फॅमिली हॉस्पिटलने कळवली होती.
भीमा करेगाव प्रकरणात स्वामी यांना 8 ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती. कारागृहात त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांचा पाच जुलै रोजी मृत्यू झाला.
न्यायालयाने हे सुध्दा नमुद केले की, त्यांच्याविरोधात जे काही सुरू होते, ते कायदेशीरदृष्ट्या वेगळा मुद्दा होता मात्र आम्हाला स्वामी यांच्या कार्याबद्दल प्रचंड आदर आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेला त्यांच्या मृत्यूनंतर टीकेला सामोरे जावे लागल्याचा उल्लेख करून न्यायालयाने स्पष्ट केले की, खटल्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या अनेक खटल्यात कच्चे कैदी कारागृहात खितपत पडतात त्याबाबत खेद वाटतो. त्याचवेळी स्वामी यांच्या वैद्यकीय जामीन अर्ज आणि त्यांच्या सहकैद्यांचे अर्ज यावेळी आम्ही नि:पक्ष राहिलो आहोत.