#व्हिडीओ; विजयी संकल्प रॅलीचा साताऱ्यात जल्लोष

गांधी मैदानावर कार्यकर्त्याचा उत्साह शिगेला; दोन्ही राजे एकत्रितपणे सातारकरांना सामोरे

सातारा: भाजप -शिवसेना युतीचे लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले व सतारा विधानसभेचे उमेदवार शिवेंद्रसि़हराजे भोसले यांच्या संकल्प रॅलीचा साताऱ्यात मंगळवारी धुरळा मोठा जल्लोष पाहायला मिळाला. शिंग तुताऱ्या ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीत दोन्ही राजे संकल्प रॅलीत दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

जलमंदिर व सुरूची या शुक्रवार पेठेतील दोन सत्ता केंद्रांवर मंगळवारी कार्यकर्त्यांची विशेष लगबग होती. भगवे झेंडे , कमळाचे चिन्ह असलेले उपरणे, मी पण कार्यकर्ता असे दर्शवणाऱ्या टोप्या यामुळे संकल्प रॅलीचे वातावरण भाजपमय झाले होते . जलमंदिर व सुरूची या दोन्ही नेत्यांच्या निवासस्थानासमोर समर्थकांची प्रचंड गर्दी होती. दोन्ही ठिकाणी रॅलीची जोरदार तयारी सुरू होती. राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी उदयनराजे भोसले व वेदांतिकाराजे भोसले यांनी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी औक्षण केले. दोन्ही राजांनी एकत्रितपणे साताऱ्याचे ग्रामदैवत असणाऱ्या ढोल्या गणपतीचे दर्शन घेतले.

दुपारी बाराच्या दरम्यान शिंग तुताऱ्यांच्या निनादात दोन्ही राजे राजवाड्यासमोरील गोल बागेसमोर संकल्प रॅलीच्या रथावर स्वार झाले. तत्पूर्वी शिवेंद्रसिंहराजे यांना आणण्यासाठी उदयनराजे सुरूचीवर दाखल झाले. तेव्हा कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जोरदार जल्लोष केला . गोलबागेसमोर अनेक सातारकरांना दोन्ही राजांनी एकत्रितपणे नमस्कार केला आणि संकल्प रॅली जल्लोषात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मार्गस्थ झाली. दोन्ही राजेंचे शहरात ठिकठिकाणी जल्लोषात पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. संकल्प रॅलीत दोन्ही राजांसमवेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष नीता केळकर, भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या कांताताई नलावडे, भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी जिल्हाध्यक्ष भरत पाटील, नगरसेवक धनंजय जांभळे, भाजप शहराध्यक्ष विकास गोसावी, रंजना रावत, गीतांजली कदम, चित्रलेखा माने कदम यावेळी उपस्थित होते.

रॅली गांधी मैदान, मोती चौक, देवी चौक, कमानी हौद येथून शेटे चौककडून पोलीस मुख्यालयाकडून पोवई नाक्याकडे आली . दोन्ही राजांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रॅलीमध्ये तरूण कार्यकर्त्यांचा प्रचंड भरणा होता. युवा समर्थकांनी साताऱ्यातून मोठी दुचाकी रॅली काढली. या संकल्प रॅलीच्या निमित्ताने साताऱ्यात दोन्ही राजांचे जोरदार शक्तीप्रदर्शन झाले. संपूर्ण साताऱ्यात कोठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून सातारा शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता . जिल्हाधिकारी कार्यालय व प्रांत कार्यालय येथे पोलीसांचा मोठा फौजफाटा होता. अतिरिकत पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी स्वतः या बंदोबस्ताची पाहणी केली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)