अॅमनोरा शाळेप्रकरणी प्रश्‍न सोडवा

शिक्षण आयुक्‍त्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना


विद्यार्थी व पालकांचे ठिय्या आंदोलन सुरुच

पुणे – हडपसर येथील ऍमनोरा शाळेप्रकरणी लक्ष घालून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्‍न सोडवावा, अशा सूचना शिक्षण आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. शाळा प्रशासन, पालक प्रतिनिधी, अधिकारी यांची बैठक घेऊन शिक्षण आयुक्तांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला आहे.

वाढीव फी न भरल्यामुळे ऍमनोरा शाळेने विद्यार्थ्यांना थेट पोस्टाने शाळा सोडल्याचे दाखलेच पाठविले होते. या विरोधात पालकांनी शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे तक्रारी केल्या. विविध प्रकारची आंदोलनेही केली. शिक्षण विभागाने शाळोला काही आदेश बजाविले. मात्र शाळेकडून हे आदेश धुडकावून लावण्यात आले आहेत. त्यातच या विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात अद्याप प्रवेश न दिल्यामुळे पालक व विद्यार्थ्यांनी गेल्या पाच दिवसांपासून शाळेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.

शाळेने 166 विद्यार्थ्यांना प्रवेश दिलेला नाही. शाळा मनमानी कारभार करुन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहे. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा पालकांकडून देण्यात आलेला आहे, अशी माहिती पालकांच्या वतीने सोनल कोद्रे यांनी दिली आहे.

शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सोमवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे, विभागीय शिक्षण उपसंचालक मिनाक्षी राऊत यांच्यासह शाळा प्रशासन, पालक प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. आयुक्तांनी चर्चा करुन सर्वांची बाजू समजून घेतली. प्रश्‍न निकाली काढण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत, अशा सूचनाही आयुक्तांनी बैठकीत दिल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.