लक्षवेधी: संकल्प प्रदूषणमुक्‍त दिवाळीचा

सागर ननावरे

सगळ्या सण, उत्सवांमध्ये दीपावली सणाचा थाट काही वेगळाच असतो. या दीपावलीला सर्वत्र उत्साहाचं, चैतन्याचं वातावरण असतं. या आनंदाच्या उधळणीत पर्यावरणाची मात्र धूळदाण होताना दिसते.

दीपावली देशभरात अतिशय धुमधडाक्‍यात साजरा केला जाणारा सण. या सणाला देशभरात आनंदाचे उधाण आल्याचे पाहावयास मिळते.
दिवाळी सण आहे मोठा
जिथे आनंदाला नाही तोटा
असे म्हणत आनंदाची आणि उत्साहाची उधळण या सणाला केली जाते. रोषणाई आणि आतिषबाजी हे या दिवाळी सणात अधिकच रंगत आणत असतात. दरवर्षी दिवाळीच्या अंधाऱ्या रात्रीत झगमगत्या दिव्यांनी व आकाश कंदील आणि फटाक्‍यांच्या रोषणाईनी याच्या दिव्यतेचा अंदाज येतो.

मात्र, दिवाळीत ध्वनी व वायू प्रदूषणाचा सामाना करावा लागतो. फटाक्‍यांच्या अतिवापराने प्रदूषणाची समस्या निर्माण होऊन शरीरावर त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. फटक्‍यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण आणि आगीच्या घटना घडताना दिसतात. दिवाळीच्या सणात सायंकाळी सहानंतर ध्वनिप्रदूषणाचा स्तर सामान्य स्तरापेक्षा सुमारे 40 ते 50 टक्‍क्‍यांनी वाढलेला असतो. ध्वनिप्रदूषण अधिनियमानुसार औद्योगिक भागात दिवसा 75 डेसिबल्स तर रात्री 70 डेसिबल्स ध्वनिमर्यादा ठरविली गेली आहे. तर व्यापारी क्षेत्रांत दिवसा 65 डेसिबल्स तर रात्री 55 डेसिबल्स ध्वनिमर्यादा घालून देण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे सर्वांत महत्त्वाचे म्हणजे रहिवासी भागात दिवसा 55 डेसिबल्स तर रात्री 45 डेसिबल्स आणि शांतता असणाऱ्या रहिवासी भागात दिवसा 50 डेसिबल्स तर रात्री 40 डेसिबल्सपर्यंतच ध्वनिमर्यादा देण्यात आली आहे. ध्वनिप्रदूषण नियंत्रित राहण्यासाठी ही ध्वनीमर्यादा राखणे बंधनकारक आहे. ध्वनिप्रदूषणाबाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्यास ते नागरिकांच्या हक्‍कांचे उल्लंघन केल्यासारखेच आहे, असे शासकीय परिपत्रकात म्हटले गेले आहे. त्यामुळे याचे उल्लंघन झाल्यास पोलिसांकडून तातडीने कारवाई करण्याचे आदेशही यात देण्यात आले आहेत. मात्र, असे असतानाही हे नियम धाब्यावर बसवून अनेकदा नियमांचे उल्लंघन केले जाते. यातही उल्लंघन केल्याचे सिद्ध झाल्यास मात्र कारवाईचा बडगा उगारला जातो.

ध्वनिप्रदूषणाप्रमाणेच मोठ्या प्रमाणात होणारे वायुप्रदूषण हे तर समस्त मानव व प्राणिजातीसाठी मोठी धोक्‍याची घंटा मानली गेली आहे. वायूप्रदूषणामुळे तर पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होताना दिसून येते. एका संस्थेने केलेल्या फटाक्‍यांच्या वैज्ञानिक तपासणीनुसार फटाके बनविताना त्यात काही धातू आणि रासायनिक संयुगे वापरली जातात. कॅडमियम, जस्त, झिंक, मॅग्नेशियम, तांबे, मॅंगनीज इ. मिश्रित धातू वापरले जातात. त्याचबरोबर नायट्रेट, सल्फेट, नायट्राइट आणि फॉस्फेट सारखी आम्लधर्मीय मूलके यात असतात. या साऱ्या धातू आणि संयुगांच्या मिश्रणातून कार्बन मोनॉक्‍साइड आणि नायट्रोजन डायॉक्‍साइड यासारखे विषारी वायू फटाके फोडल्यावर बाहेर पडत असतात. या शोभेच्या दारूतून बाहेर फेकले जाणारे हे वायू श्‍वसनाद्वारे मानवी शरीरात प्रवेश करतात. परिणामी मानवी शरीरासाठी हे भयंकर घातक मानले जाते. यातून सर्दी, खोकला, मानसिक अशांती, ब्रॉंकायटिस यासारख्या व्याधीही निर्माण होतात.

फटाक्‍यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि वायू प्रदूषण मानवासाठी जितके घातक आहे त्यापेक्षा पशुपक्ष्यांसाठी कितीतरी अधिक घातक आहे. दिवाळीच्या काळात अनेक पशुपक्षी जखमी तसेच मृत पडल्याच्याही अनेक घटना घडल्या आहेत. त्याचप्रमाणे फटाक्‍यांमुळे आगी सारखी आपत्तीजनक दुर्घटना घडून त्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी व जीवितहानी होताना दिसते. दरवर्षी दिवाळीला देशभरात फटाक्‍यांमुळे शेकडो आगीच्या दुर्घटना घडतात. थोडक्‍यात सांगायचे तर आनंदाचा आणि उत्साहाचा दीपोत्सव या फटाक्‍यांमुळे बरबटला जात आहे. धूर आणि कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने आनंदाचा स्तर दिवसेंदिवस खालावत चालला आहे.

दिवाळी केवळ फटाक्‍यांच्या आतषबाजीनेच पूर्ण होते असे नाही. दिवाळीचा आनंद घेण्यासाठी बाकी अनेक गोष्टी आहेतच की. दिवाळी हा सण एकमेकांत एकोपा वाढविणारा सण आहे. एकमेकांना भेटून, मिठाई वाटून, फराळ करून दिवाळी सणाला स्नेह वृद्धिंगत केला जातो. त्यामुळे आपल्या असुरी आनंदाने इतरांच्या आनंदावर विरजण तर पडत नाही ना याचा आपण प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आनंद वाटल्याने वाढतो हे लक्षात घेऊन प्रदूषणमुक्‍त दिवाळी साजरी केली पाहिजे. प्रदूषणमुक्‍त दिवाळीसाठी गेल्या काही वर्षांपासून अनेक पर्यावरणप्रेमी, स्वयंसेवी संघटनांनी जनजागृती राबविण्यास सुरुवात केली आहे आणि त्यात अनेक सजग नागरिक पुढाकार घेऊन प्रदूषणमुक्‍त दिवाळी साजरी करीत आहेत. फटाक्‍यांच्या पैशाचा वापर गोरगरिबांना कपडे, पैसे, मिठाई देऊन त्यांच्याही चेहऱ्यावर दिवाळसणाचा आनंद आणत आहेत.

चला आपणही यंदाच्या दिवाळीला काहीतरी वेगळा विचार करू या. प्रदूषणमुक्‍त दिवाळीचा संकप करून आनंदाची देवाणघेवाण करू या. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करून येणाऱ्या पिढीला निरोगी व आनंदी दिवाळीचा वारसा देऊ या. यंदाची दिवाळी प्रदूषणरहित दिवाळी साजरी केली जावी हीच आपल्या सजग नागरिकांकडून अपेक्षा. निरोगी, आनंदी आणि प्रदूषणमुक्‍त दिवाळीसाठी हार्दिक शुभेच्छा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.