पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय व तत्परतेने सोडवणूक व्हावी, या हेतूने विविध पातळीवर लोकशाही दिन आयोजित करण्यात येऊन नागरिकांच्या तक्रारीवर निर्णय घेण्यात येतात.
विभागीय लोकशाही दिनामधे दाखल प्रकरणांवर सुनावणी घेऊन दिलेल्या आदेशाचे प्रशासनाने काटेकोरपणे व त्वरित पालन करून तक्रारी तातडीने सोडवाव्यात; अन्यथा त्याची गंभीर दखल घेण्यात येईल, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत.
विभागीय आयुक्त कार्यालय सभागृहात विभागीय स्तरावरील लोकशाही दिनातील प्रकरणांच्या सुनावणीदरम्यान ते बोलत होते.
पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, महसूल उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण, नगरपालिका प्रशासन उपायुक्त पूनम मेहता, करमणूक कर उपायुक्त नीलिमा धायगुडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक मुख्य अभियंता आर. वाय. पाटील आदी या वेळी उपस्थित होते.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार निवारण न झालेल्या तीन प्रकरणांवर या वेळी डॉ. पुलकुंडवार यांनी अर्जदारांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देऊन सुनावणी घेतली. अर्जदारांच्या तक्रारींचे निवारण तातडीने करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
जिल्हास्तरावर सुटणाऱ्या समस्यांसाठी नागरिकांना विभागीय लोकशाही दिनात यावे लागते, हे योग्य नसून जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, आणि संबंधित अधिकाऱ्यांनी अर्जदाराच्या तक्रारी सोडवाव्यात, असे डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.
जनतेच्या तक्रारी सोडविण्यामध्ये हलगर्जीपणा झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरून प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असेही या वेळी त्यांनी सूचित केले. या वेळी विविध विभागांचे विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते.