जम्मू : पाकव्याप्त काश्मीरमधील रहिवाशांना पाकिस्तान परदेशी नागरिक मानतो. मात्र, भारतीय तसे मानत नाहीत. त्या रहिवाशांना आम्ही आपले मानतो. त्यामुळे त्यांनी भारताचा भाग बनावे, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचारासाठी राजनाथ यांनी रविवारी सभा घेतल्या. त्यामध्ये बोलताना त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील रहिवाशांना ऑफर दिली. त्यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला फटकारले.
शेजारील देशांशी संबंध सुधरवण्यास कुणाला आवडणार नाही? मित्र बदलता येऊ शकतो; पण शेजारी नव्हे. आम्हाला पाकिस्तानशी चांगले संबंध हवे आहेत. पण, त्यासाठी त्या देशाने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाला खतपाणी घालणे थांबवावे. तसे घडल्यास आम्ही त्या देशाशी चर्चाप्रक्रिया सुरू करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यघटनेचे कलम ३७० पुन्हा लागू करण्याचे आश्वासन नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेसची आघाडी देत आहे. पण, भाजप असेपर्यंत ते शक्य नाही. ते कलम हटवण्यात आल्यापासून जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा स्थितीत प्रचंड सुधारणा झाली आहे.
तरूण आता पिस्तुल आणि रिव्हॉल्वरऐवजी हातांमध्ये कॉम्प्युटर आणि लॅपटॉप घेऊन फिरत आहेत. आता श्रीनगरमध्ये सामान्य जनतेवर गोळीबार करण्याचे धाडस कुणी करत नाही, असा दावा त्यांनी केला. जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला जनतेने पाठिंबा द्यावा. तसे झाल्यास मोठा विकास शक्य होईल. तो विकास पाहून पाकव्याप्त काश्मीरमधील रहिवाशांचे मन परिवर्तन घडेल. पाकिस्तानबरोबर राहण्याची आमची इच्छा नाही. आम्ही भारतात जाऊ इच्छितो असे त्यांनी म्हणायला हवे, अशी शाब्दिक टोलेबाजी राजनाथ यांनी केली.