Resham Tipnis : मराठमोळी अभिनेत्री रेशम टिपणीसला ‘बाजीगर’ या चित्रपटामुळे मोठी लोकप्रियता मिळाली. यानंतर तिने चित्रपटांसह अनेक मालिकांमध्ये देखील काम केले आहे. परंतु सध्या रेशम एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री रेशम टिपणीस हिच्या मुलाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरली होती. ज्यानंतर तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
रेशम टिपणीसच्या मुलाने इमारतीच्या ५१ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावर रेशमने प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मुलाच्या निधनाच्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे देखील तिने म्हंटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा नववीत शिकत होता. तो त्याच्या आईबरोबर सी ब्रूक इमारतीत ५१ व्या मजल्यावर राहत होता. या मुलाच्या आत्महत्येनंतर अनेकांनी हा १४ वर्षांचा मुलगा अभिनेत्री रेशम टिपणीसचा मुलगा असल्याचा दावा केला. पण रेशमने या या खोट्या अफवांवर संताप व्यक्त केला आहे.
रेशम टिपणीस काय म्हणाली?
रेशमने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका पोस्टवर कमेंट केली आहे. “कृपया याकडे दुर्लक्ष करा. कोणीतरी माझा मुलगा मानवबद्दल खोट्या बातम्या पसरवत आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने तो बरा आणि सुदृढ आहे. पण ज्या कुणी त्याच्याबद्दल ही खोटी बातमी पसरवली आहे, तो नक्कीच तुरुंगात जाईल.
जर कोणी मला खोट्या बातम्या पसरवणाऱ्याला शोधण्यास मदत करू शकत असेल तर प्लीज कमेंट करा,” असं रेशम टिपणीसने म्हटले आहे. तसेच खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा तिने दिला आहे. दरम्यान, बुधवारी संध्याकाळी कांदिवली पश्चिम येथे एक दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर रेशम टिपणीसच्या मुलाबद्दलचा हा गोंधळ सुरू झाला होता. मात्र ह्या अफवा असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.