क्रीडा विभागाचा निर्णय
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या व्यायामशाळांमध्ये रोज दोन तास महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. शहरातील 82 व्यायाम शाळांमध्ये महिलांना ही सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे. शहरातील महिलांच्या आरोग्यासाठी महापालिकेच्या क्रीडा विभागाने हा निर्णय घेतला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण 82 व्यायाम शाळांपैकी 32 व्यायामशाळा महापालिकेच्या वतीने चालविल्या जातात. तर, इतर 50 व्यायाम शाळा खासगी संस्थांना चालविण्यास देण्यात आलेल्या आहेत. मार्च 2020 पासून शहरात करोना प्रादुर्भाव वाढला आहे. या काळात कमी रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या महिला, नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागला.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या उद्देशाने क्रीडा विभागाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील महापालिकेच्या व्यायामशाळेमध्ये सकाळी एक तास व सायकाळी एक तास असे दोन तास महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेकडून चालविल्या जाणाऱ्या व पालिकेने खासगी संस्थांना चालविण्यास दिलेल्या दोन्ही व्यायामशाळांमध्ये ही वेळ राखीव ठेवण्यात येणार आहे.
पालिका व्यायामशाळांमध्ये सकाळी नऊ ते दहा वाजता व सायंकाळी चार ते पाच वाजता ही वेळ महिलांसाठी राखीव ठेवण्यात येईल. तर, पालिकेने सेवाशुल्क तत्वावर खासगी संस्थांना चालविण्यास दिलेल्या व्यायामशाळांमध्ये सकाळी दहा ते अकरा व सायंकाळी तीन ते चार वाजताची वेळ महिलांसाठी राखीव आहे.
शहरातील महिलांना आपल्या आरोग्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व्यायामशाळांमध्ये दिलेल्या राखीव वेळेचा सदुपयोग करावा असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.