पिरंगुट : मुळशीतील कोरोनाबाधित रुग्णांना सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये ३० बेडचा एक वार्ड राखीव ठेवण्यात येणार आहे. तसेच गरीब व गरजू रुग्णांवर मोफत उपचार मिळणार आहेत. मुळशीतील पत्रकारांच्या या मागणीला यश मिळाले आहे. यासाठी आमदार संग्राम थोपटे यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.
मुळशी तालुक्यात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. तसेच या रुग्णांवर उपचारासाठी तालुक्यात शासकीय रुग्णालय नाही. तालुक्यात असलेल्या सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये मुळशी तालुक्यातील कोरोनाबाधितांसाठी राखीव बेड असावेत तसेच रुग्णांवर मोफत उपचार मिळावेत अशी मागणी पत्रकारांनी खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे व तहसीलदार अभय चव्हाण यांच्याकडे केली होती.
पत्रकार रमेश ससार, संजय दुधाणे, विनोद माझिरे, दिपक सोनवणे, प्रवीण सातव, सागर शितोळे तसेच शांताराम इंगवले, रविंद्र कंधारे यांनी हे निवेदन तहसीलदारांना दिले होते. तसेच पत्रकारांच्या प्रतिनिधीने आमदार संग्राम थोपटे यांच्याशी संपर्क करून माहिती दिली होती. त्यानुसार संग्राम थोपटे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि हॉस्पिटलच्या प्रशासनाशी चर्चा करून भेटण्याची वेळ घेतली.
आज पत्रकार रमेश ससार, संजय दुधाणे, विनोद माझिरे, प्रवीण सातव व आमदार संग्राम थोपटे यांचे प्रतिनिधी मुळशी तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, मुळशी तालुका युवक अध्यक्ष सुहास भोते, जिल्हा सरचिटणीस दादाराम मांडेकर यांनी हॉस्पिटलच्या प्रशासनाशी भेट घेतली. हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय नटराजन, डॉ. खुशाली रात्रा यांच्याशी या प्रतिनिधींनी चर्चा केली.
त्यानुसार झालेल्या चर्चेत सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये मुळशीतील करोना बाधित रुग्णांसाठी ३० बेडचा एक वेगळा वार्ड राखीव करण्यात येणार आहे. तसेच गरजू व गरीब रुग्णांवर योग्य तो समन्वय साधून मोफत उपचार करण्यात येतील, असे डॉ. विजय नटराजन व डॉ. खुशाली रात्रा यांनी या प्रतिनिधींना सांगितले.