नगर | महापालिका कर्मचार्‍यांसाठी रेमडेसिविर राखीव ठेवा

कामगार संघटनेतर्फे कॉम्रेड भैरवनाथ वाकळे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

नगर (प्रतिनिधी) – अत्यावश्यक सेवेत ‘फ्रंटलाईन’वर काम करणार्‍या महापालिका कर्मचार्‍यांचे आरोग्य  केवळ रेमडेसिवीरअभावी धोक्यात आले आहे. त्यामुळे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगरसाठी दिल्लीहून आणलेल्या रेमडेसिवीच्या 300 इंजेक्शन्सपैकी किमान 50 इंजेक्शन्स करोनायोध्दे असलेल्या महापालिका कर्मचार्‍यांसाठी राखीव ठेवावेत, अशी मागणी इंडस्ट्रीयल कामगार संघटनेतर्फे कॉम्रेड भैरवनाथ वाकळे व कॉम्रेड प्रा. डॉ. महेबुब सय्यद यांनी केली आहे.

यासंदर्भात वाकळे यांनी काल महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. महापालिकेचे कर्मचारी सध्या शहरातील हॉस्पिटलमध्ये गंभीर परिस्थितीत आहेत. कामगार युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड अनंत लोखंडे यांनी ही माहिती दिली.

या कर्मचार्‍यांसाठी हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या मागणीप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष तसेच मनपा आरोग्याधिकारी यांना सतत संपर्क केलेला आहे. परंतु काळाबाजार अथवा इंजेक्शन्सचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने सर्वच जण हतबल असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. महापालिकेचे कर्मचारी जिवावर उदार होऊन जनतेच्या सेवेत कार्यरत आहेत. त्यांनाच जर इंजेक्शन मिळत नसतील तर खरेच हे निषेधार्ह आहेच.

सबब, नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी थेट दिल्लीवरून 300 इंजेक्शन्स आणलेले आहेत त्यापैकी 50 इंजेक्शन्स  महापालिकेच्या कोरोनायोध्दे असलेल्या फ्रन्टलाईन वर्कर्ससाठी खासदारांशी पत्रव्यवहार करून राखीव करावेत, अशी मागणी वाकळे व सय्यद यांनी केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.