मुंबई – अमेरिकेच्या अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यापासून जागतिक व्यापारावर परिणाम होत आहे. त्याचबरोबर डॉलर वधारत असून भारताच्या रुपयासह इतर चलनांचे मूल्य कमी होत आहे. भारताकडील परकीय चलन साठ्याचे मूल्य या एक महिन्यात बरेच कमी झाले आहे. यामुळे परकीय चलन साठा वाढावा यासाठी रिझर्व बँकेने प्रयत्न सुरू केले आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून रिझर्व बँकेने परकीय चलनातील ठेवीवरील व्याजदरात वाढ केली आहे. रिझर्व बँकेने यासंदर्भात जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, फॉरेन करन्सी नॉन रेसिडेंट बँक ठेवींवरील व्याजदरात काही प्रमाणात वाढ करण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. या नव्या नियमाची अंमलबजावणी सहा डिसेंबर पासून चालू झाली असून ती 31 मार्च 2025 पर्यंत कार्यरत राहणार आहे.
यामुळे एक ते तीन आणि तीन ते पाच वर्षाच्या परकीय चलनातील ठेवीवर अधिक व्याज मिळणार आहे. अशा परिस्थितीत बँका आता परकीय चलनातून ठेवी आकर्षित करण्याचा प्रयत्न करतील त्यामुळे भारताकडील डॉलरचा साठा वाढू शकेल. बँकांना आवश्यक असलेले भांडवल उपलब्ध होऊ शकेल असे समजले जाते. यामुळे ठेवीवरील व्याजदर ठरविताना सध्याच्या चलन बाजारातील अस्थिरतेचा परिणाम होत नाही. मात्र असे असले तरी काही बँकर्सनी सांगितले की, बँकांना इतर स्त्रोतातूनन परकीय गुंतवणूक उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे बँका या पर्यायाचा वापर जास्त प्रमाणात करण्याची शक्यता कमी आहे.
सप्टेंबरच्या सुमारास भारताकडील परकीय चलन साठा 700 अब्ज डॉलरच्या पुढे गेला होता. मात्र त्यानंतर जागतिक घडामोडीचा रुपयाच्या मूल्यावर परिणाम होत आहे. परकीय गुंतवणूक शेअर बाजारातून आणि इतर क्षेत्रातून कमी होत आहे. या कारणामुळे भारताकडील परकीय चलन साठा कमी होऊन 650 अब्ज डॉलरच्या जवळपास आला आहे. या कालावधीत रुपयाचे मूल्य स्थिर करण्यासाठी रिझर्व बँकेने डॉलरचा वापर बर्याच प्रमाणात केला असल्याचे समजले जाते.