रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरवाढीची चूक करू नये 

उद्योगांच्या वाढत असलेल्या उत्पादकतेला व्याजदरवाढीने खीळ बसण्याची शक्‍यता जीएसटी व नोटाबंदीनंतर उद्योगांची उत्पादकता वाढत असल्याचे ताळेबंदावरून दिसत आहे. इतक्‍यात व्याजदरात आणखी वाढ केल्यास उद्योगांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो. 
मार्क मोबीस, आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार 
मुंबई: महागाई वाढलेली असली आणि रुपया बराच घसरलेला असला तरी रिझर्व्ह बॅंकेने 1 ऑगस्ट रोजी व्याजदरात वाढ करून नये असे वेगाने विकसित होणाऱ्या देशात बरीच गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार मार्क मोबीस यांनी सुचविले आहे. 
रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची बैठक सोमवारपासून सुरू झाली आहे. बुधवारी बॅंक पतधोरण जाहीर करणार आहे. याच काळात जपान आणि अमेरिकेच्या केंद्रीय बॅंका पतधोरण जाहीर करणार आहेत. त्यांच्याकडून व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्‍यता आहे. मात्र भारताची सध्याची अर्थव्यवस्था पाहता रिझर्व्ह बॅंकेने महागाई रोखण्याऐवजी उत्पादकता वाढविण्यास प्राधान्यक्रम देण्याची गरज असल्याचे मोबीस यांनी सांगीतले. 
महागाई वाढण्याची शक्‍यता असल्यामुळे चार आठवड्यापूर्वी रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात पाव टक्‍क्‍यांनी वाढ केली होती. चार वर्षांनंतर बॅंकेने व्याजदरात वाढ केली होती. त्यानंतर महागाईची आकडेवारी जाहीर झाली आहे. त्यानुसार किरकोळ आणि घाऊक महागाईचा दर ठरविलेल्या 5 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त झालेला आहे. त्याचबरोबर वाढत असलेले क्रुडचे दर आणि घसरत असलेल्या रुपयामुळे त्यात भर पडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बऱ्याच विश्‍लेषकांनी व्याजदर वाढण्याची शक्‍यता सूचित केली आहे. तसे केले तर चूक होईल असे माबीस यांना वाटते. 
त्यांनी सांगितले की, नोटाबंदी आणि जीएसटीच्या प्रभावातून आता भारतीय अर्थव्यवस्था बाहेर आल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पहिल्या तिमाहीचे ताळेबंद चांगले आहेत. आता पुन्हा रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात वाढ करून वाढत असलेल्या उत्पादकतेत खिळ घालणे बरोबर होणार नाही. कारण अनेक राज्यांसमोर अनेक प्रश्‍न आहेत. खरे पाहता व्याजदरात घट करण्याची गरज असल्याचे त्यांना वाटते. 
मात्र व्याजदर वाढीचे समर्थन करणाऱ्यांनी सांगितले की, घसरणारा रुपया, वाढलेली महागाई आणि वाढलेले क्रुडचे दर पतधोरण समितीला विचारात घ्यावे लागणारच आहेत. त्याचबरोबर काही राज्यांनी वेतन आयोगाच्या शिफारशी अंमलात आणायचे ठरविले आहे. त्याचबरोबर कृषी उत्पादनाना दीडपट हमी भाव मिळणार आहे. त्यामुळे चलनवाढ होणार आहे त्यासाठी रिझर्व्ह बॅंकेला व्याजदरात वाढ करावी लागणार असल्याचे अनेक विश्‍लेषकांनी सूचित केले आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)